MCA करणार घटनेत बदल, तेंडुलकर-गावस्करांना बसणार झटका | पुढारी

MCA करणार घटनेत बदल, तेंडुलकर-गावस्करांना बसणार झटका

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतेच आपल्या घटनेत बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणी अजून सुनावणी झालेली नाही. त्यातच आता बीसीसीआयनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशननेही आपल्या घटनेत दुरुस्ती करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांसह मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंकडून मतदानाचा हक्क काढून घेण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे.

एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) २९ जुलै रोजी सर्वसाधारण सभेची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंडळाच्या घटनेत अनेक बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंकडून मतदानाचा हक्क काढून घेणे, ७० वर्षांवरील अधिकाऱ्यांना पदावर कायम राहण्याची परवानगी देणे, संघटनेच्या सचिवांना अधिक अधिकार देणे आदी प्रस्तावांचा समावेश आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबईतून येणाऱ्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा मतदानाचा हक्क हिरावला जाणार आहे. त्यात सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक राज्याच्या संघटनेला त्यांच्या घटनेत बदल करायचे होते. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या लोढा समितीने माजी क्रिकेटपटूंना मतदानाचा अधिकार दिला होता आणि वयाच्या ७० व्या वर्षांनंतर त्यांना कोणतेही पद भूषवण्यास मनाई केली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनने आपल्या अधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना असोसिएट सदस्य म्हणून जोडले जाईल, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार नसेल, असे म्हटले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन व्यतिरिक्त बीसीसीआयला सध्या आपल्या घटनेत काही बदल करायचे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तरच बीसीसीआय हे करू शकते. बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

Back to top button