राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती | पुढारी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक टन कांदा भेट देणार ; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकर्‍यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने कांद्याची विक्री करावी लागत आहे. कांदाप्रश्नावर केंद्र सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना साकडे घातले जाणार आहे. यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून त्यांना एक टन कांदाही भेट देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना कृषिप्रधान अशी ओळख असलेल्या देशामध्ये कांद्याला सतत मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे आर्थिक नुकसान होत असून, ज्या ज्या वेळेस कांद्याचे थोडेफार दर वाढतात, त्यावेळेस कांदा निर्यातबंदी करणे, परदेशी कांदा आयात करणे, साठा मर्यादा घातल्या जातात. त्याचवेळी कांदादर पडल्यानंतर सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून, कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असून, आजमितीस शेतकर्‍यांनी साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला सरासरी नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.

अपवाद वगळता शेतकर्‍यांना कांदा पिकाला सतत उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत असल्याने दिवसेंदिवस शेतकर्‍यांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जागतिक पातळीवर कांदा उत्पादक शेतकर्‍यांना कांद्याची नियमित बाजारपेठ मिळवून द्यावी तसेच देशांतर्गत कांद्याचे दर निश्चित करून द्यावे, यासाठी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्र सरकारला सूचना कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीमध्ये नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. यावेळी नवनिर्वाचित राष्ट्रपती मुर्मू यांना संघटनेच्या वतीने एक टन कांदा भेट म्हणून देणार असल्याचेही दिघोळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button