

लोणावळा : शहरात सध्या मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून, पावसाने शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी द्विशतकीय पारी खेळली आहे. मंगळवारी 220 मिलिमीटर (8.66 इंच), बुधवारी 213 मिलिमीटर (8.39 इंच), गुरुवारी 234 मिलिमीटर (9.21 इंच) तर शुक्रवारी 227 मिलिमीटर (8.94 इंच) पावसाची नोंद लोणावळा शहरात करण्यात आली आहे.
एकूण बघता केवळ या चार दिवसांत लोणावळा शहरात 894 मिलिमीटर (35.20इंच) पाऊस पडला. शहारत गुरुवारी सकाळी 7 ते शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत एकूण 24 तासांत 227 मिलिमीटर (8.94 इंच) पावसाची नोंद झाली. शहरात आजपर्यंत 2196 मिलिमीटर (86.46 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत लोणावळा शहरात 1374 मिलिमीटर (54.09 इंच) पाऊस झाला होता.
या जोरदार पावसामुळे लोणावळा धरणाची पाणी पातळी वाढली असून धरणाच्या सांडव्यावरुन अनियंत्रित स्वरुपाने इंद्रायणी नदीत पाणी वाहण्याची शक्यता मागील तीन दिवसांपासून व्यक्त केली जात आहे; पण सरी वर सरी बरसत असल्या तरी अधूनमधून एक दोन तासांसाठी पावसाचा जोर कमी होत असल्याने तेवढ्या वेळेत टाटा पॉवर कंपनी लोणावळा धरणातील पाणी डक्टलाईन मार्गे खोपोली पॉवर स्टेशनकडे पाठवत असल्याने धरणाची पाणी पातळी काही प्रमाणात कमी होत आहे.
जोरदार पावसामुळे शहरातील तुंगार्ली भागातील बद्रीविशाल सोसायटी, गोल्ड व्हॅली, मावळा पुतळा चौकातील रस्ता, रायवुड रोड, नगर परिषद रुग्णालयासमोरील रस्ता, शहानी रोड, नांगरगाव वलवण रस्ता पाण्याखाली जात आहे. भांगरवाडी भागात एका ठिकाणी सुरक्षा भिंत आणि रस्ता खचण्याचा प्रकारदेखील घडला आहे. पावसाच्यासोबत वारादेखील मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. काही ठिकाणी फांद्या तुटणे, वीज वितरण तारा तुटणे, केबल वायर तुटणे असे प्रकार घडत आहेत.
पर्यटनस्थळावर कलम 144 लागू
सध्या सुरू असलेली अतिवृष्टी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदीचे कलम 144 लागू केले असून, अनेक पर्यटनस्थळांसह गडकिल्ले, धबधबे, धरण आदी ठिकणी पर्यटक, गिर्यारोहक, ट्रेकर्स यांना सुरक्षेच्यादृष्टीने बंदी घालण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर लोणावळा शहरातून भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, घुबड तलाव याकडे जाणार्या मार्गावर लोणावळा पोलिसांकडून कडक नाकाबंदी लावण्यात आली आहे. केवळ त्याभागात राहणार्या स्थानिक रहिवाशांना तसेच ज्यांचे बंगले आणि हॉटेलचं बुकिंग झालेले आहे त्यांनाच या मार्गाने सोडण्यात येत आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांचे बुकिंग तपासण्यात येत आहे.