नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड | पुढारी

नाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरासह पश्चिम पट्ट्यात संततधार सुरूच आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण, दिंडोरी, पेठ व सुरगाणा आदी तालुक्यांना त्याने झोडपले आहे. नाशिकमध्ये बुधवारी (दि.13) पहाटेपासून पावसाने पुनरागमन केले आहे. दिवसभरात शहरात 26.8 मिमी पर्जन्याची नोंद झाली. दरम्यान, अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे तलावात एक व्यक्ती बुडाली असून, सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला. काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम आहे. बुधवारी (दि.13) अनेक तालुक्यांमध्ये त्याने जोरदार सलामी दिली आहे. कळवणमध्ये पावसाचा जोर अधिक असून, तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात दिवसभरात तब्बल 376 मिमी पर्जन्याची नोंद करण्यात आली. पेठमध्येही पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. दिंडोरीच्या पश्चिम पट्ट्यात विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. नाशिक शहर व परिसरात मंगळवारी (दि. 12) पूर्ण दिवस विश्रांती घेतली. मात्र, पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील रस्ते जलयम झाले. सततच्या पावसाने रस्त्यांवर खड्डे पडल्याने त्यात पाणी साचून सर्वसामान्य नाशिककरांची दैना उडाली. दुसरीकडे गंगापूरमधील विसर्ग कायम असल्याने गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे. परिणामी, काठावरील जनजीवन सलग तिसर्‍या दिवशीही विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्येही दिवसभरात मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे शेतीकामांना अधिक वेग आला आहे.

पर्जन्य

नाशिक – 26.8 मि.मी , निफाड-125.2 मि.मी, कळवण-376 मि. मी, दिंडोरी-344 मि.मी, सिन्नर 47.6 मि.मी, पेठ-314 मि.मी, त्र्यंबकेश्वर-202.06 मि.मी, इगतपुरी 77 मि.मी, देवळा-69.4, सुरगाणा-96.02 मि.मी, मालेगाव 0.02 मिमी.

सहा जण अद्यापही बेपत्ता :

सलगच्या पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 7 व्यक्ती बुडाल्या आहेत. त्यामध्ये र्त्यंबक व सुरगाण्यातील प्रत्येकी दोघे तर नाशिक, दिंडोरी व पेठमधील प्रत्येकी एकाचा त्यात समावेश आहे. नाशिक तालुक्यातील बालकाचा मृतदेह सापडला असून, उर्वरित व्यक्तींचा शोध सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (दि.13) सुरगाणा येथे एक बैल गतप्राण झाला. दिवसभरात इगतपुरी, दिंडोरी, सुरगाणा, देवळा, कळवण व सुरगाणा येथे 84 घरांची अंशत: तर एका घराची पूर्णत: पडझड झाली. दरम्यान, दिंडोरीतील सात व सुरगाण्यातील तीन रस्ते पाण्याखाली गेले असून, एका ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या सर्व मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे. सुरगाण्यात अंगणवाडीची भिंत पडली असून, तालुक्यातील एका शेतकर्‍याची दीड हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले.

Back to top button