महाराष्ट्रातून कर्नाटकला 89 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग | पुढारी

महाराष्ट्रातून कर्नाटकला 89 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

कुरुंदवाड ; पुढारी वृत्तसेवा : कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राजापूर बंधार्‍यातून कर्नाटक राज्याला 89,750 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत तीन फुटांनी वाढ झाली आहे.

पंचगंगा नदीवरील कुरुंदवाड दरम्यानचा शिरढोण पूल पाण्याखाली गेला असून, शिरढोण, टाकवडे, इचलकरंजीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. वारणा नदीतून 829 क्यूसेक, अंकली पुलाखालून 52,439 क्यूसेक, राजाराम बंधार्‍यातून 39,153 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजापूर बंधार्‍याजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 35 फूट झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फूट झाली आहे.

कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने सातत्य ठेवल्याने नद्या दुधडी भरून वाहू लागल्या आहेत. नद्यांचे पाणी पात्राबाहेर आले आहे. कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिरढोण पुलावर सहा इंचांनी पाणी वाहू लागले आहे. कृष्णा नदीची राजापूर बंधार्‍याजवळ 35 फूट पाणीपातळी झाली. तीन शेतकर्‍यांच्या शेती पंपांचे बॅरल मोटारीसह वाहून गेले आहेत. पंचगंगा नदीवरील बंधार्‍यांची पाणीपातळी अशी ः तेरवाड बंधारा 54 फूट 6 इंच, शिरोळ बंधारा 47 फूट 1 इंच, यादव पूल 46 फूट 10 इंच.

पुराच्या पार्श्वभूमीवर गोठणपूर परिसरातील जगन्नाथ वावरे, गौस बारगीर, दत्ता करमरे यांनी आपली जनावरे कर्नाटक राज्यात एकसंबा, नंदी, हिरेकुडी येथे स्थलांतरित केली आहेत.

Back to top button