शूटिंग वर्ल्डकप 2022 : कोल्हापूरचा नेमबाज शाहू मानेचा सुवर्णवेध | पुढारी

शूटिंग वर्ल्डकप 2022 : कोल्हापूरचा नेमबाज शाहू मानेचा सुवर्णवेध

चँगवान, कोरिया : वृत्तसंस्था : येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ शूटिंग वर्ल्डकप 2022 मध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरूच आहे. बुधवारी 10 मीटर एअर रायफल मिश्र प्रकारात कोल्हापूरचा नेमबाज शाहू तुषार माने व मेहुली घोष या भारतीय जोडीने सुवर्णपदकाचा वेध घेतला, तर या प्रकारातील कांस्यपदक भारताच्याच शिवा नरवाल व पलकने पटकावले.

शाहू माने मेहुली या जोडीने हंगेरीच्या इस्तजर आणि इस्तवान पेन या जोडीचा चुरशीच्या अंतिम लढतीत 17-13 अशा फरकाने पराभव करत सुवर्णपदकाचा वेध घेतला. दरम्यान, कोल्हापूरच्या शाहू मानेने पहिल्यांदाच भारतासाठी सुवर्णपदक जिंकले, तर मेहुलीने 2019 मध्ये काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते, तर याच प्रकारात तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या लढतीत पलक व शिवा नरवाल या भारतीय जोडीने कझाकिस्थानच्या वलेरी रकिमजहान आणि इरिना लोक्तिओनोवा या जोडीचा 16-0 असा एकतर्फी पराभव करत कांस्यपदक पटकावले.

भारताने बुधवारी एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावत पदकतालिकेत दुसरे स्थान मिळविले आहे. भारतीय चमूने स्पर्धेत आतापर्यंत 2 सुवर्ण व एक कांस्य अशी एकूण तीन पदके पटकावली आहेत.

Back to top button