Nashik Market Committee : टोमॅटो दरात 20 रुपयांनी घसरण, तर कोथिंबीर तेजीत | पुढारी

Nashik Market Committee : टोमॅटो दरात 20 रुपयांनी घसरण, तर कोथिंबीर तेजीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक बाजार समितीमध्ये  (Nashik Market Committee) मागील आठवड्यात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली, तर कोथिंबीर तेजीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, सर्वच भाजीपाल्याच्या दरात मंदी असल्याचे दिसून आले आहे. या आठवड्यात सलग पाऊस झाल्यामुळे पुढच्या काळात भाजीपाल्याच्या दरात पुन्हा तेजी येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नाशिक बाजार समितीमध्ये (Nashik Market Committee) सर्व प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फळांची आवक होते. येथून मुंबईसह देशातील मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला जात असतो. साधारणपणे उन्हाळ्यात टोमॅटोच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर पावसाळाभर त्यात तेजी असते. मात्र, यावेळी ऐन जुलैमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे दिसत आहे. आठवड्याच्या सुरुवातीला किलोला सरासरी 35 रुपयांपर्यंत असलेले टोमॅटोचे दर शनिवारी (दि. 9) किलोलो सरासरी 12 रुपयांपर्यंत घसरल्याचे दिसून आले.

इतर भाजीपाल्याचेही दरही सर्वसाधारण असल्याचे दिसून आले. वांग्यांना 15 ते 35 रुपये किलो याप्रमाणे दर मिळाला. फ्लॉवर आठ ते 25 रुपये किलो, कोबी 6 ते 15 रुपये, ढोबळी मिरची 31 ते 57 रुपये किलो, भोपळा 6 ते 24 रुपये किलो, कारले 16 ते 24 रुपये किलो, दोडका 16 ते 31 रुपये किलो, गिलके 16 ते 59 रुपये किलो, भेंडी 22 ते 38 रुपये किलो, गवार 8 ते 12 रुपये किलो, लिंबू पाच ते 12 रुपये किलो, काकडी 7 ते 28 रुपये किलो, गाजर 20 ते 30 रुपये, हिरवी मिरची 30 ते 50 रुपये, कांदे 4 ते 15 रुपये किलो, बटाटे 10 ते 21 रुपये किलो, आले 30 ते 45 रुपये किलो या दराने विक्री झाले.

कोथिंबीरचे दर स्थिर : पालेभाज्यांच्या दरातील तेजी कायम असून, कोथिंबिरीच्या शंभर जुड्यांना हजार ते 7400 रुपये दर मिळाला. मेथीच्या शंभर जुड्यांना 2000 ते 3500 रुपये, शेपूला 700 ते 2250 रुपये प्रतिशंभर जुड्या व कांदापातीला 2000 ते 5500 रुपये प्रतिशंभर जुड्या याप्रमाणे दर मिळाला.

सफरचंदाचे भाव तेजीत : फळांमध्येही सफरचंद व डाळिंबाचे दर तेजीत असल्याचे दिसून आले. सफरचंदाला प्रतिकिलो 130 ते 200 रुपये व डाळिंबाला 4 ते 102 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे भाव मिळाला.

हेही वाचा :

Back to top button