Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचा अखेर राजीनामा

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत (Sri Lanka Crisis) अराजकता माजली आहे. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) यांनी अखेर राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. आपण राजीनामा देणार असल्याचे गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना कळवले आहे. हजारो निदर्शकांनी राष्ट्रपतींच्या अधिकृत निवासस्थानावर कब्जा केल्यानंतर राजपक्षे हे बुधवारी राजीनामा देतील, असे संसदेच्या अध्यक्षांनी याआधी सांगितले होते.
आंदोलकांच्या वाढत्या दबावादरम्यान श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना आपण राजीनामा देत असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. कोलंबो राजपत्रानुसार, राजपक्षे यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राजीनामा देतील, अशी माहिती पंतप्रधानांच्या मीडिया युनिटने दिली आहे. गेल्या शनिवारी श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा आबेवर्देना यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते की, राष्ट्रपती १३ जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देतील.
- …तर श्रीलंका उद्ध्वस्त होईल, सध्यस्थिती भयावह; माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांच्याकडून चिंता व्यक्त
शनिवारी मोठ्या संख्येने फोर्ट येथील राष्ट्रपती भवनात हजारो लोक घुसले. त्यांचा राष्ट्रपती भवनात ठिय्या दिला आहे. यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही देशात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. मात्र, जोपर्यंत राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती निवासस्थान आमच्या ताब्यात राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
- व्हिडिओ : श्रीलंकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यावेळी आंदोलकांची धडक, सनथ जयसूर्या आंदोलनात सहभागी
श्रीलंकेतील परिस्थिती गंभीर (Sri Lanka Crisis) बनली आहे. येथील चार मंत्र्यांनीही तडकाफडकी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यानंतर आता तेथे सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
दरम्यान, भारताने आपण श्रीलंकेतील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा निर्वाळा दिला आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री धम्मिका परेरा यांच्यासह हारिन फर्नांडो, मनुषा नानयक्कारा आणि बंदुला गुणवर्देना अशी राजीनामा दिलेल्या चौघा मंत्र्यांची नावे आहेत.
President Gotabaya Rajapaksa has officially informed PM Ranil Wickremesinghe that he will be resigning as previously announced: Sri Lanka PM’s office
— ANI (@ANI) July 11, 2022