धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले | पुढारी

धनुष्यबाण आमचाच ! नाशिकमध्ये संजय राऊत गरजले

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

राज्यात काय सुरु आहे याचा नाशिकशी काहीही संबध नाही. नाशिकमध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. नाशिकचे सर्व माजी नगरसेवक शिवसेनेसोबत असून कधीही निवडणूका घ्या नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल. सध्या जे काही सुरु आहे ते कृत्रिम वादळ आहे, ते दूर होईल आणि शिवसेना नव्या ताकदीने उभी राहील. भाजपला चाळीस नवे भोंगे मिळाले आहेत, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या पण धनुष्यबाणाचे चिन्ह शिवसेनेचे आहे व शिवसेनेचेच राहील असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौ-यावर असताना व्यक्त केला.

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे, नवी मुंबई येथील नगरसेवकांसह काही पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत. अशा स्वरूपाची बंडखोरी टाळण्याकरिता आता शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याची धडपड सुरू असून, नाशिकमध्ये अशा स्वरूपाचे बंड होऊ नये, याकरिता खबरदारी म्हणून उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख खासदार संजय राऊत हे नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. ते उद्याही नाशिकमध्येच असणार आहेत. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बंडखोरांबाबत विचारले असता राऊत म्हणाले, जे आमदार गेले आहेत ते विधानसभेत परत जाणार नाही हे लोकांनी ठरवले आहे. या आमदारांनी प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यामुळे राऊतांनी नुकसान केले हा त्यांचा चुकीचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बाकी असताना बहुमत चाचणी घेतली. राज्यपाल राज्यघटनेचे पालन करणारे नाही. झुंडशाहीतून हे सरकार निर्माण झाले आहे असा आरोप राऊत यांनी यावेळी केला. हिंदुत्ववादी म्हणून घेणा-या 40 आमदारांनी आपली भूमिका आदी स्पष्ट करावी असाही घणाघात त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाला शिवसेना संपवायची आहे. कारण त्यांना मुंबई मिळवायची आहे. मुंबईचे तुकडे करणे हेच त्यांचे धोरण असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे यांची पत्रकारपरिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button