winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले, तीन मोठ्या कंपन्यांचे आगमन | पुढारी

winery in nashik : विंचूरला वाइनरींचे जाळे आणखी विस्तारले, तीन मोठ्या कंपन्यांचे आगमन

नाशिक : सतीश डोंगरे
देशाचे वाइन कॅपिटल म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकमध्ये वाइनरींचे (winery in nashik) जाळे आणखी विस्तारले आहे. विंचूरमध्ये तीन वाइन कंपन्यांनी तब्बल 25 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली असून, नाशिकमधील वाइनरींच्या संख्येत भर घातली आहे. या वाइनरींच्या माध्यमातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून, यातील एक वाइनरी प्रत्यक्ष सुरू झाल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

35 वर्षांपूर्वी नाशिकच्या वाइनरीचा (winery in nashik) प्रवास सुरू झाला होता. बघता-बघता नाशिक वाइन कॅपिटल सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले. नाशिकची वाइन देश-विदेशात प्रसिद्ध असून, वाइनरीजमुळे द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांनाही मोठा फायदा झाला आहे. सद्यस्थितीत नाशिकमध्ये 38 वाइनरीज सुरू असून, 20 हजार ते 50 लाख लिटरपर्यंत वाइननिर्मितीची या वाइनरीजमध्ये क्षमता आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रासह इतरही राज्यांत नाशिकच्या वाइनचा बोलबाला वाढल्याने, बर्‍याच कंपन्या सध्या नाशिकमध्ये वाइन इंडस्ट्रीत गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत.

विंचूर भागात अनेक भूखंड रिक्त असून, अनेकांकडून त्याकरिता एमआयडीसीकडे विचारणा केली जात आहे. या भागात वाइनरीजबरोबरच फूड्स पार्कही विकसित करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या तीन नव्या कंपन्यांमधील एक कंपनी प्रत्यक्ष सुरू झाली असून, अन्य दोन कंपन्यांचे काम प्रगतिपथावर आहे. या तिन्ही कंपन्यांनी 25 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.

काम प्रगतीपथावर 

वाइनरीजबरोबर या भागात फूड्स पार्कदेखील विकसित केले जात आहेत. याकरिता अनेक गुंतवणूकदार पुढे येत आहेत. सध्या विंचूर वाइन पार्कमध्ये फूड पार्कचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या काळात अनेक कंपन्या या भागात गुंतवणूक करतील, अशा पद्धतीने नियोजन केले जात आहे.

95 टक्के कंपन्यांकडून क्रशिंग

जिल्ह्यातील 90 ते 95 टक्के वाइनरीजमध्ये (winery in nashik) क्रशिंगचे काम केले जात आहे. त्यामुळे दर्जेदार वाइननिर्मितीस मदत मिळत असून, ग्राहकवर्ग वाढत आहे. गेल्या वर्षात एकाही कंपनीची टाकी रिकामी राहिली किंवा वाइन विकली गेली नाही, असे समोर आले नाही. पूर्वी बंगळुरू, गोवा येथेच नाशिकची वाइन विकली जायची. आता इतर राज्यांतही नाशिकच्या वाइनला मागणी वाढली आहे. ग्राहक तयार होत असल्याने वाइन गुंतवणुकीकडेही कल वाढत आहे.

शासनाचे सकारात्मक धोरण तसेच कोविड काळात समोर आलेल्या वाइनच्या फायद्यांमुळे पुढच्या काळात वाइनरीजमध्ये आणखी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. ‘फनसाठी अल्कोहोल आणि हेल्थसाठी वाइन’ असा विचार पुढे येत असल्याने, नाशिकमध्ये वाइनरीजचे जाळे आणखी विस्तारणार आहे.
– जगदीश होळकर, अध्यक्ष,
अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटना

‘इंडोस्प्रीट’ची गुंतवणूक

‘इंडोस्प्रीट’ या मोठ्या कंपनीने विंचूर येथील इंडिया फूड ही वाइनरी टेकओव्हर केली आहे. या कंपनीकडून या ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्यात आली असून, त्यामुळे रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विंचूरमधील वाइन पार्कला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button