जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा, पालकमंत्री पदाकडे नजरा | पुढारी

जळगावला तीन मंत्रिपदे? दिग्गजांच्या नावांची चर्चा, पालकमंत्री पदाकडे नजरा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सत्ता संघर्ष मिटल्यानंतर जिल्ह्यात बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे हे जातीय समीकरण कसे सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात भाजपकडून गिरीश महाजन, तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद असल्याचे पक्के मानले जात आहे, तर एका मंत्र्याची राज्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे समजत आहे.

जळगाव जिल्ह्यातून बंडखोरी करणार्‍या आमदारांमध्ये अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील व शिवसेना आमदार गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, लता सोनवणे आणि किशोर पाटील यांचा समावेश आहे. त्यामध्ये मंत्रिपद सोडून आलेले गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जात आहे, तर राज्यमंत्री पदासाठी चिमणराव पाटील आणि किशोर पाटील यांच्यात चढाओढ आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात मराठा समाजातून प्रतिनिधित्व करणारे चिमणराव पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे, तर पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे शिंदेंच्या जवळचे असल्याने त्यांचेही मंत्रिपद निश्चित असल्याचे बोलले जात आहे. या दोघांपैकी कुणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

कोण होणार पालकमंत्री?
जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. मात्र, या दोघांपैकी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपच्या सत्ता काळात गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपद होते, तर आता महाविकास आघाडीच्या काळात गुलाबराव पाटील हे पालकमंत्री होते. गिरीश महाजनांकडे काही वर्षांसाठी नाशिकचे पालकमंत्रिपद होते. आगामी काळात नाशिक महापालिकेची निवडणूक असल्यामुळे त्यांना नाशिकचे पालकमंत्रिपद दिले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Back to top button