बदलापूरच्या कंपन्यांचा नाशिकमध्ये विस्तार ; तब्बल ‘इतकी’ रोजगारनिर्मिती होणार | पुढारी

बदलापूरच्या कंपन्यांचा नाशिकमध्ये विस्तार ; तब्बल 'इतकी' रोजगारनिर्मिती होणार

नाशिक : सतीश डोंगरे
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मालेगावमधील अजंग रावळगाव येथे टेक्सटाइल पार्क उभारण्यासाठी कंबर कसली असून, त्यास बदलापूरमधील 17 लघुउद्योजकांनी मोठे बळ दिले आहे. या उद्योजकांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी या ठिकाणी तब्बल 575 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली असून, या टेक्सटाइल उद्योगांमधून तब्बल 1,827 रोजगार उपलब्ध होणार आहेत.

मालेगावपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अजंग रावळगाव या औद्योगिक वसाहतीतील सुमारे 350 हेक्टरवर टेक्सटाइल पार्क उभारला जात आहे. त्याकरिता मालेगावमधील सायने व अजंग येथून मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात आले असून, उद्योजकांना सवलतीच्या दरात भूखंडही उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 400 प्रस्ताव मागविले होते. त्यास 267 उद्योजकांनी प्रतिसाद दिला असता 228 भूखंडांचे वितरणही करण्यात आले होते. आता बदलापूरमधील तब्बल 17 लघुउद्योजकांचा एक गटच या ठिकाणी आल्याने, टेक्सटाइल पार्कला मोठे बळ मिळाले आहे. या उद्योजकांनी 575.26 कोटींची या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. तसेच 1,827 रोजगार निर्मितीदेखील होणार आहे. एमआयडीसीने या सर्व उद्योगांना भूखंड वितरित केले असून, लवकरच उद्योग उभारणीचे काम पूर्ण होऊन टेक्सटाइल पार्क जोमाने कार्यरत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या टेक्सटाइल पार्कमध्ये प्लास्टिक, फूड तसेच वस्त्रोद्योगांसह इतर उत्पादनांच्या उद्योगांचा समावेश असणार आहे. मालेगाव तालुक्यात हा पार्क उभारला जात असल्याने, त्याचा फायदा धुळे, नरडाणा, नवापूर व नंदुरबार जिल्ह्यातील वस्त्रोद्योगांना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

  • बायोटेक कंपनीने 30 कोटींची नव्याने
    गुंतवणूक केली आहे. रोजगारनिर्मिती वाढेल.

या उद्योगांचा समावेश
व्हेलिएंट ग्लास वर्क, आर. के. टेक्सटाइल, बालाजी इन्फ्राटेक अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., प्रपोज्ड प्रा. लि. डॅनियल फॅशन प्रोसेसर, खत्री डायनिंग प्रा. लि., सुभालक्ष्मी क्निट फॅब, सी. के. टेक्सटाइल, श्री कर्णी टेक्सटाइल, तेजस एंटरप्रायजेस, राजेश शर्मा, श्री लक्ष्मी डायनिंग, कैलास टेक्सटाइल, नारायणी एंटरप्रायजेस, मि. राजेश आर. सिंग अ‍ॅण्ड मि. सचिन पी. शानबाग प्रोमोटर ऑफ प्रपोज्ड पार्टनरशिप, पटोदिया फिलामेन्ट्स प्रा. लि. आदी.

‘पुन्हा’ सहकार्य करू
मालेगाव आणि परिसरात पारंपरिक यंत्रमाग आणि टेक्सटाइल या उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तसेच इकोसिस्टिम आहे. त्यामुळे सर्वच पूरक बाबी या ठिकाणी असल्याने, बाहेरील उद्योगांनी या ठिकाणी यायला हवे. उद्योजकांना योग्य ते सहकार्य आम्ही ‘पुन्हा’ करू.
– प्रदीप पेशकार, सदस्य, एमएसएमई बोर्ड

फूड्स कंपन्यांचीही गुंतवणूक

टेक्स्टाइल कंपन्यांसह फूड्स कंपन्यांचीही या ठिकाणी मोठी गुंतवणूक दिसून येत आहे. नव्याने तीन फूड कंपन्यांनी तब्बल 75 कोटींची या ठिकाणी गुंतवणूक केली आहे. त्या व्यतिरिक्त एका अ‍ॅग्री प्रोड्युस कंपनीने 21.57 कोटींची गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा :

Back to top button