सांगलीत तीन दिवस ‘सेतू’चा सर्व्हर डाऊन | पुढारी

सांगलीत तीन दिवस ‘सेतू’चा सर्व्हर डाऊन

सांगली : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक कामासाठी लागणारे विविध दाखले, निराधार योजनेतील लाभार्थींना आवश्यक उत्पन्‍नाचा दाखला मिळवण्यासाठी सांगलीतील तहसील कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, तीन दिवसांपासून सेतूचा सर्व्हर डाऊन आहे. परिणामी आबाल-वृद्धांची फरफट होत आहे. तहानभूक विसरून तीन दिवसांपासून रांगेत थांबावे लागले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांना डोमिसाईल, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर आणि उत्पन्नाचा दाखला गरजेचा पडतो.

शासनाच्या विविध योजनांच्या लाभासाठी विधवा, निराधार आणि ज्येष्ठांना आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी तीन ते चार दिवसांपासून हेलपाटे मारावे लागत आहेत. राजवाडा चौकातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत तहसील कार्यालय आणि सेतू कार्यालय आहे. येथेच व्हरांड्यात दाटीवाटीने दीडशे ते दोनशे जण रांगेत उभे राहतात. मात्र दिवसभर थांबूनही दाखले मिळत नाहीत. सेतू कार्यालयात सर्व्हर डाऊन असल्याने सात ते दहा मिनिटांच्या कामाला एक ते सव्वा तास लागतो. त्यामुळे दिवसभरात जेमतेम पन्नासजणांना दाखले मिळतात.

याचा त्रास महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक आणि आबालवृद्धांना सहन करावा लागत आहे. वयोवृद्धांना पेन्शन मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखल मुदतीत जमा करावा लागतो. मात्र तसे होत नाही. दाखल्यासाठी या लोकांना तीन – तीन दिवस दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी या लोकांमधून मागणी होऊ लागली आहे.

Back to top button