जनसुराज्य सत्तेत भागीदार होणार! | पुढारी

जनसुराज्य सत्तेत भागीदार होणार!

बांबवडे ; आनंदा केसरे : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात राज्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे नेते आ. विनय कोरे यांना सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कोरे यांचा पक्ष भाजपचा सहयोगी पक्ष आहे. माजी आमदार सत्यजित पाटील हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांच्या सोबत राहतील, त्यामुळे मतदारसंघात पारंपरिक विरोधकांतच लढत होणार आहे.

शाहूवाडी तालुक्यात सरूडकर यांचा शिवसेना गट, कोरे यांचा जनसुराज्य शक्‍ती पक्ष, कर्णसिंह गायकवाड यांचा काँग्रेस गट, तर मानसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी गट असे प्रमुख गट आहेत. यात शिवसेना-राष्ट्रवादी यांची युती आहे, तर जनसुराज्य व काँग्रेस यांची आघाडी आहे. मागील विधानसभा आणि अन्य निवडणुका याच आघाड्यांमध्ये झाल्या. भविष्यातील निवडणुकाही याच आघाड्यांमध्ये होणार असल्याने राज्यातील राजकीय घडामोडींचा म्हणावा असा परिणाम होणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी आमदार सत्यजित पाटील दोन दिवस नॉट रिचेबल होते; परंतु लगेचच सरूडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने डॉ. विनय कोरे व सरूडकर यांच्या भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट होत आहेत.

शाहूवाडी तालुक्यात पक्षापेक्षा गटा-तटाचे राजकारण प्रभावी आहे. मागील निवडणुकीत असणार्‍या राजकीय आघाड्या कायम राहणार असल्याने राज्याच्या राजकारणाचा, नव्या समीकरणाचा फारसा परिणाम होणार नाही.

Back to top button