Suhas Kande : नांदगावकरांना लाल दिव्याचे वेध!

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतून बंड केलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांना संभाव्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदगावला लाल दिवा मिळणार असल्याने कांदे समर्थकांमधून आनंदोत्सवाची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गत दहा दिवसांपासून शिंदे गटात सामील असलेले कांदे आणि मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार दादा भुसे यांची संभाव्य मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे. आ. कांदे यांनी विकास आणि कडवे हिंदुत्व या मुद्यावर शिंदे गटात सामील झाल्याची भावनाही व्यक्त केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांच्या रूपाने नांदगावला लाल दिवा मिळण्याची शक्यता वर्तविली जात असून, नवीन सरकार स्थापनेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एकंदरीत शिंदेंचे कट्टर समर्थक असलेले कांदे यांनी मतदारसंघात शिवसेनेने तिसरे आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला आहे. यापूर्वी शिवसेनेतून प्रथम विजयी झालेले माजी आमदार आर. डी. देशमुख यांनीदेखील काही काळ छगन भुजबळांसोबत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता पण ते पुन्हा शिवसेनेत सामील झाले. त्यानंतर दुसर्यांदा माजी आमदार संजय पवार यांनी नांदगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजयी झाले होते. मात्र, ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहेत.
हेही वाचा :
- कोल्हापूर : डॉक्टरांवर हल्ल्याचा प्रयत्न; 7 जणांवर गुन्हा
- Sangli: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयितांना पोलिस कोठडी
- कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण रद्द; सुधारित आराखडा करण्याच्या सल्लागारास सूचना