Nashik : सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीत ‘सडकछाप भाईंची’ दहशत, पोलिसांपुढे आव्हान | पुढारी

Nashik : सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीत ‘सडकछाप भाईंची’ दहशत, पोलिसांपुढे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून, पोलिसांच्या कर्तबगारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कोणीही यावे अन् दहशत निर्माण करावी, अशी स्थिती असल्याने गल्लीबोळांत सडकछाप भाई निर्माण झाले आहेत. सातपूर परिसरातील सोमेश्वर कॉलनीमध्ये तर या टवाळखोरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. चौकाचौकांत टोळक्याने उभे राहून मुलींची छेड काढण्याबरोबरच दहशत निर्माण करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. या भागात पोलिस फिरकतच नसल्याने, या भाईंना अभय मिळत आहे.

सातपूर विभागातील सर्वसामान्यांची वसाहत म्हणून ओळखला जाणारा सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर, सद्गुरूनगर हा परिसर सध्या भाईंचा अड्डा झाला आहे. परिसरात दहशत पसरविण्यासाठी टवाळखोरांच्या गटाचा प्रचंड उपद्रव सध्या जाणवत असून, त्यांच्यामध्येच वर्चस्वासाठी हाणामार्‍यांचे प्रकारही नित्याचेच झाले आहेत. अशाच कारणातून मंगळवारी (दि.28) दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले. कोयते काढून एकमेकांवर वार करण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर चौकाचौकांत टोळक्यांनी उभे राहून येणार्‍या-जाणार्‍या तरुणींची छेड काढण्याचे प्रकारही दररोजच सुरू आहेत. कॉलनीतील रस्ते छोटे व वळणाचे असले, तरी वेगाने व सुसाट दुचाकी पळवितात. त्यामुळे लहान मुलांना बाहेर घेऊन फिरणेही अवघड होत आहे. त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकदेखील शतपावलीसाठी बाहेर येणे टाळत आहेत. त्यामुळे या टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

रस्त्यावर बर्थ डे सेलिब्रेशन 
परिसरात दहशत माजविण्यासाठी सडकछाप भाईंकडून भररस्त्यात बर्थ डे सेलिब—ेशन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रस्त्यात बर्थ डे सेलिब—ेशन करण्याचा ट्रेंड चांगलाच वाढला आहे. सोमेश्वर कॉलनी परिसरात मनपाने प्रशस्त सभागृह व ग्रीन जीमही उभारले आहे. मात्र, या सभागृहाची देखभाल करण्यासाठी वॉचमन नसल्याने हा मद्यपींचा अड्डा बनला आहे.

अल्पवयीन मुलांची भाईगिरी वाढली
परिसरात दहशत पसरविणार्‍यांमध्ये अल्पवयीनांची मोठी संख्या आहे. त्यांच्याकडून दुचाकी जोरात चालविणे, रस्त्यांवर घोळका करून उभे राहणे, मुलींची छेड काढणे, येणार्‍या-जाणार्‍यांना धमकावणे असे प्रकार दररोज घडत आहेत. तसेच हाणामार्‍यांमध्येही हे अल्पवयीन आघाडीवर आहेत. त्यांच्यात पोलिसांची अजिबातच भीती दिसून येत नाही.

कार्बन नाका येथील पोलिस चौकी नव्याने कार्यान्वित करण्यात आली आहे. सोमेश्वर कॉलनी व परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. टवाळखोरांचा उपद्रव होत असेल तर दक्ष नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. टवाळखोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील.
– महेंद्र चव्हाण,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातपूर

हेही वाचा :

Back to top button