सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून | पुढारी

सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकांच्या मुलाला बेदम मारहाण करुन त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पार्किंगमधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चौघा जणांनी त्याला मारहाण केली वर्मी घाव लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३, रा. आंबेगाव बु) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. युवराज जंबु कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे, मनोज दत्तात्रय सूर्यवंशी, विष्णु कचरुन कदम (रा. नºहे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटे ते २७ जून सकाळी १० वाजून ५ मिनिटे या दरम्यान आंबेगाव बु़ येथील साई विश्व सोसायटी, न्यू प्यासा बार समोरील पार्किंगच्या जागेत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि खून झालेल्या तरुणाचा पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन वाद झाला होता. त्यावेळी आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या शरीराचे स्प्लीन (हा एक मुठीच्या आकाराचा अवयव आहे जो तुमच्या पोटाच्या वरच्या डाव्या बाजूला, तुमच्या पोटाच्या पुढे आणि तुमच्या डाव्या फास्यांच्या मागे असतो) या अत्यंत नाजूक अवयवावर वारंवार हाताने ठोसे मारुन अंतर्गत गंभीर दुखापत करुन त्याला जिवे ठार मारले.

त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट, मोबाईल, हेडफोन ई वस्तू चोरुन नेल्या. हा सर्व प्रकार विष्णु कदम याने समक्ष घडलेला पाहिला़ मात्र त्यांनी त्याची माहिती कोणालाही दिली नाही़ जर त्यांनी हे पोलिसांना कळविले असते तर जखमीला वेळेवर मदत मिळाली असती व त्यातून त्याचा कदाचित जीव वाचला असता़ खूनासारख्या गुन्ह्यात माहिती न देता, हेतू पुरस्पर कुचराई म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

श्री साई मोटर्स येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर त्यांना गुन्ह्याची सर्व माहिती मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर तपास करीत आहेत.

Back to top button