नाशिककरांसाठी शुभवार्ता : वर्षात 62 कंपन्यांकडून सात हजार कोटींची गुंतवणूक, 'इतकी' रोजगारनिर्मिती | पुढारी

नाशिककरांसाठी शुभवार्ता : वर्षात 62 कंपन्यांकडून सात हजार कोटींची गुंतवणूक, 'इतकी' रोजगारनिर्मिती

नाशिक : सतीश डोंगरे

2021-22 या वर्षभराच्या काळात नाशिकमध्ये देशांतर्गत तसेच विदेशी असलेल्या 62 कंपन्यांकडून तब्बल सात हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, यातून तब्बल सात हजार 676 रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील बहुतांश कंपन्यांनी प्रकल्पनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली असून, वर्षभरातच या कंपन्या पूर्णक्षमतेने कार्यरत होण्याची शक्यता आहे.

उद्योगवाढीसह विस्तारासाठी सर्वोत्तम पर्याय ठरत असलेल्या नाशिकमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठमोठ्या कंपन्यांचे समूह गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. दिंडोरी अक्राळे येथे रिलायन्स समूहाने तब्बल 2,100 कोटींची गुंतवणूक केल्याने नाशिकच्या उद्योगनगरीला प्रचंड महत्त्व आले आहे. रिलायन्सबरोबर इंडियन ऑइल कंपनीची एंट्रीही इतर उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी टर्निंग पॉइंट ठरली आहे. त्यामुळेच की काय, एकट्या अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीत तब्बल पाच हजार 901.67 कोटींची गुंतवणूक आली आहे. या वसाहतीत नव्या उद्योगांसह उद्योग विस्ताराला उद्योजकांकडून प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर येवला औद्योगिक वसाहतीत 120 कोटींची नवी गुंतवणूक आली आहे, तर मालेगाव, अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीत तब्बल 823.34 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

या गुंतवणुकीतून अतिरिक्त दिंडोरी औद्योगिक वसाहतीमधून चार हजार 762 नवे रोजगार मिळणार आहेत. येवल्यातून 56, तर मालेगाव, अजंग रावळगाव औद्योगिक वसाहतीत दोन हजार 924 रोजगार उपलब्ध होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे 62 पैकी बहुतांश कंपन्यांची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांना भूखंडांचे वाटपही करण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या वर्षभरातच हे सर्व उद्योग पूर्णक्षमतेने सुरू होऊन नाशिकच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहेत. दरम्यान, अजूनही गुंतवणुकीचा ओघ सुरूच असून, मोठमोठ्या कंपन्या सध्या भूखंडासाठी एमआयडीसीकडे चाचपणी करीत आहेत.

1,206 कोटी रुपयांची रिलायन्सची गुंतवणूक

रिलायन्स समूहाच्या रिलायन्स लाइफ सायन्स कंपनीने दिंडोरी येथील तळेगाव अक्राळे येथे मोठी गुंतवणूक केली आहे. या ठिकाणी कंपनीकडून ‘लाइफ सेव्हिंग’ औषधे, लस, प्लाझ्मा थेरपी आदी उत्पादनांची निर्मिती केली जाणार आहे. त्याकरिता एमआयडीसीकडून 161 एकरांचा मोठा भूखंड घेण्यात आला आहे. दरम्यान, याच ठिकाणी रिलायन्सने आणखी 1,206 कोटींची गुंतवणूक केली असून, त्या ठिकाणी वेगळ्या प्रॉडक्टची निर्मिती केली जाणार आहे.

पुढच्या वर्षभरात नाशिकमध्ये या गुंतवणुकीचे परिणाम दिसून येतील. नाशिकचा विकास हा एकमेव विचार ठेवून प्रशासनाची धडपड सुरू असून, त्यात आम्हाला यश येत आहे. आणखी बरेच उद्योग नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. नाशिकसाठी नव्या उद्योगांसह, उद्योग विस्तारासाठी ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे.
– नितीन गवळी,
प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

अ‍ॅग्री आणि फार्मा इंडस्ट्री
गेल्या वर्षभरात गुंतवणूक केलेल्या
62 नव्या कंपन्यांमध्ये अ‍ॅग्री आणि फार्मा इंडस्ट्रिजची संख्या अधिक आहे. अनेक मोठे फूड प्रोसेसिंग युनिट जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीत उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर फार्मा इंडस्ट्रिजचे जाळेही मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. नाशिकच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button