विषप्रयोगामुळे अख्ख्या कुटुंबाचा तडफडून मृत्यू! | पुढारी

विषप्रयोगामुळे अख्ख्या कुटुंबाचा तडफडून मृत्यू!

सांगली : सचिन लाड :  मांत्रिक आब्बास बागवान व त्याचा साथीदार धीरज सुरवशे या दोघांनी वनमोरे कुटुंबीयांवर विषप्रयोग केला. या दोघांच्या डोळ्यादेखत सगळ्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्यानंतर सगळे पुरावे नामशेष करून मांत्रिक आणि त्याच्या साथीदाराने पळ काढला. वनमोरे कुटुंबीयांच्याच घरात बसून या दोघांनी अवघ्या आठ तासात हे नृशंस हत्याकांड केल्याचे तपासातून पुढे येत आहे.

मांत्रिक आब्बास बागवान हा 19 जूनरोजी रात्री नऊ वाजता वनमोरेंच्या घरी आल्याचे स्पष्ट झाले आहे. गुप्तधनासाठी त्याने पूजेचा बेत आखला होता, असे समजते. पूजेपूर्वी जेवणातून किंवा चहातून विष घालून त्याने नऊ जणांचा बळी घेतला. कोणाला संशय येऊ नये, यासाठी जेवण व चहा केलेली भांडी धुऊन पहाटे पाचला तो पसार झाला. कट रचून त्याने हे हत्याकांड केले. हत्याकांड करण्यासाठी तब्बल आठ तास तो वनमोरेंच्या घरी मुक्कामी होता, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे.

अत्यंत गुंतागुंतीचे व आव्हानात्मक बनलेल्या या हत्याकांडाचा तब्बल आठ दिवसांपासून तपास सुरू आहे. गुप्तधनाचा मुद्दा तपासात पुढे येताच तपासाची पूर्ण दिशा बदलली. मांत्रिक आब्बास बागवान व त्याचा साथीदार धीरज सुरवशे या दोघांच्या मुसक्या आवळल्यानंतर या धक्कादायक घटनेचा उलघडा झाला. गुप्तधन शोधून देण्यासाठी बागवान याने वनमोरे कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेतली होती. गेली सहा महिने झाले हे कुटुंब बागवानच्या संपर्कात होते. अनेकदा तो वनमोरे यांच्या घरी येऊन गेला. घराची पाहणी केली. गुप्तधन कुठे आहे, ती जागाही दाखविली. या बदल्यात तो नेहमी पैसे घेऊन जायचा.

प्रत्यक्षात बागवान गुप्तधन शोधून देत नाही, हे लक्षात आल्यानंतर वनमोरे यांनी त्याच्याकडे दिलेले पैसे परत करण्याची मागणी केली. त्यामुळे बागवान चिडला. पोलिसांत हे कुटुंब तक्रार करेल, अशी त्याला भीती लागून राहिली. यासाठी त्याने 19 जून रोजी गुप्तधन शोधून देण्याचे मान्य केले. मात्र, तत्पूर्वीच त्याने या कुटुंबाच्या हत्येचा कट रचला होता. कुटुंबातील सर्व सदस्य हजर पाहिजेत, असे त्याने सांगितले. त्यामुळे मग पोपट वनमोरे यांनी त्यांची कोल्हापूर येथे बँकेत नोकरीला असलेल्या मुलीला बोलावून घेतले.

बागवान साथीदाराला घेऊन 19 जूनला दुपारी चारलाच सोलापुरातून निघाला होता. रात्री नऊ वाजता वनमोरेंच्या घरी आला. तो आल्याचे शेजार्‍यांनी पाहिले होते. पूजेची सर्व तयारी केली. तत्पूर्वी सर्वांनी जेवणाची पार्टी केली. याच जेवणात बागवान याने विष मिसळलेे का? अथवा प्रसाद म्हणून या कुटुंबास काय खायला दिले? याबाबत सध्या तपास सुरू आहे. नऊ जणांवर विषप्रयोग झालाय, हे मात्र मान्यच करावे लागते. पूजा झाली का नाही, याबद्दल घटनास्थळी काहीच पुरावे मिळालेले नाहीत. पण विषप्रयोग झाल्यानंतर काही वेळेच्या अंतराने नऊ जणांचा तडफडून मृत्यू झाला.

त्यानंतर बागवानने घरातील जेवणाची भांडी धुऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सर्वजण मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर पहाटे पाच वाजता त्याने पलायन केले. हे हत्याकांड करण्यासाठी तब्बल आठ तास वनमोरेंच्या घरी मुक्कामी होता, आदी बाबी तपासातून आणि चर्चेतून पुढे येत आहेत. त्याद‍ृष्टीने तपास सुरू आहे. दरम्यान, या मांत्रिकावर जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत आठ वर्षांपूर्वी सोलापुरातही गुन्हा दाखल झाला होता.

अनेक मुद्द्यांवर सुरू आहे पोलिसांचा तपास!

  • वनमोरे कुटुंब मांत्रिकाच्या संपर्कात आले कसे?
    मांत्रिकाने कोणत्या विषाचा केला प्रयोग?
    विषारी द्रव्य दिलेे कशातून आणि कधी?
  • मृतदेह घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कसे?
  • पोपट वनमोरे यांच्या घरी मांत्रिक गेला कधी?
  • वनमोरे कुटुंबाने मांत्रिकाला किती पैसे दिले?
  • अंतिम ‘पोस्टमार्टेम’ अहवालाकडे पोलिसांचे लक्ष.
  • आणखी कोणाचा सहभाग आहे का?

Back to top button