नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात 25 ते 29 जूनपर्यंत सभासद याद्या बघण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, हरकती न नोंदविता विरोधकांनी सोमवारी (दि.27) जोरदार घोेषणाबाजी करत सभासद याद्याच पळविल्याचा गंभीर आरोप मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना मतदारयाद्या बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दुरुस्तीनंतर अंतिम सभासद यादी कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात नवीन सभासद झालेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे. लवादाच्या मान्यतेनंतरच अधिकृत यादी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विरोधकांचा गोंधळ आणि सेवकांना दमदाटी करणे चुकीचे असल्याचे श्रीमती पवार यांनी सांगितले.
लेखापरीक्षण होण्यापूर्वीच विरोधकांकडून अहवालाची मागणी होत आहे. संस्थेचे अंदाजपत्रक सुमारे आठशे कोटींपर्यंत पोहोचल्याने विरोधकांचे डोळे फिरत आहे. संस्थेचे वाढते आर्थिक बजेट विरोधकांना कागद चोरण्यास प्रवृत्त करत आहे. बिगर सभासदांना घेऊन विरोधकांनी गोंधळ घातला. अंतिम सभासद यादी तयार झाल्यानंतर सर्वांसाठी खुली होणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढविण्यास तयार नसून, सरचिटणीसपदासाठी आ. माणिक कोकाटे, माणिक बोरस्ते व श्रीराम शेटे यांचे नावे सुचविले होते. मात्र, सभासदांकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला जात असल्याचे पवार यांनी सांगतले. दरम्यान, संस्थेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र पवार यांनी पत्राद्वारे विरोधकांच्या गोंधळाचा निषेध नोंदविला.
ठाकरेंना नोटीस, तर पिंगळेंचे निलंबन
मविप्र संस्थेच्या हितास बाधा पोहोचविल्याचा ठपका ठेवत माजी सभापती अॅड. नितीन ठाकरे यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आलेली आहे. तर फार्मसी कॉलेजचे प्रा. अशोक पिंगळे यांच्याविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.