नाशिक : महर्षी लघुपट स्पर्धेत ‘मुंघ्यार’ची बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट | पुढारी

नाशिक : महर्षी लघुपट स्पर्धेत ‘मुंघ्यार’ची बाजी, ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथे आयोजित महर्षी लघुपट महोत्सव 2022 मध्ये दिग्दर्शक नीलेश आंबेडकर यांच्या ‘मुंघ्यार’ या लघुपटाने पहिला क्रमांक मिळवून, स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. अभिनेता चिन्मय उदगीरकर, निर्माता संजय झनकर यांच्या हस्ते ‘मुंघ्यार’चे दिग्दर्शक व निर्माता नीलेश आंबेडकर यांना प्रदान करण्यात आला. रुपये 10 हजार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते चिन्मय उदगीरकर, झी मराठी चित्र वाहिनीचे निर्माता संजय झनकर, गीव्ह संस्थेचे रमेश अय्यर, महर्षीचे अध्यक्ष निशिकांत पगारे व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘मुंघ्यार’ एका आदिवासी कुटुंबाची कथा असून, त्या कुटुंबाला जातपंचायतीच्या जुलमी प्रथेमुळे भोगाव्या लागणार्‍या अन्यायाची ही गोष्ट आहे. मुंघ्यार जातपांचायतीच्या जुलमी प्रथेविरुद्ध, शिक्षण, बालविवाह आणि जातिव्यवस्थेबद्दल भाष्य करतो. मधुरा मोरे, अनुप ढेकणे, राहुल सोनवणे, सचिन धारणकर, नितीन जाधव, तिलोत्तमा बाविस्कर, सिद्धार्थ सपकाळे, आरती बोराडे, दीपाली मोरे, विमल बोढारे, नरेंद्र सोनवणे, अविनाश जुमडे, भोरु कुंदे, प्रमोद परदेशी, मंगेश ठेंगे या कलाकारांच्या भूमिका या लघुपटात आहेत. मनोहर दौंड यांनी चित्रीकरण, मयूर सातपुते यांनी संपादन, शशिकांत कांबळी यांनी संगीत, गीत रचना जाधव तर पार्श्वगायन रूपाली कदम यांनी केले असून, कथा नीलेश आंबेडकर यांनी लिहिली आहे.

नुकताच राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या 7 व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘मुंघ्यार’ या मराठी लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून, येत्या 30 जूनला दिल्लीत विज्ञान भवन येथे दिग्दर्शक नीलेश आंबेडकर यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button