चित्रपटसृष्टीचा उल्लेख इंडियन फिल्म इंडस्ट्री व्हावा; अनुराग ठाकूर यांची भूमिका | पुढारी

चित्रपटसृष्टीचा उल्लेख इंडियन फिल्म इंडस्ट्री व्हावा; अनुराग ठाकूर यांची भूमिका

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘देशात प्रादेशिक क्षेत्रानुसार बॉलीवूड, टॉलीवूड, कॉलीवूड अशी नावे चित्रपटसृष्टीला देण्यात आली आहेत, ते मला आवडत नाही. त्यामुळे या सर्वांचा एकत्रित उल्लेख इंडियन फिल्म इंडस्ट्री असा होणे गरजेचे आहे,’ अशी भूमिका माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी मांडली. सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयू) वतीने ‘चेंजिंग लँडस्केप ऑफ मीडिया अँड एन्टरटेन्मेंट’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ठाकूर बोलत होते. ऑस्कर विजेता साउंड डिझायनर रसूल पूकुट्टी, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आदी उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, ‘डिजिटल युगात रेडिओ, चित्रपट आणि मनोरंजन उद्योगात रोजगाराच्या संधी आहेत. चित्रफीत संकलन, कलर ग्रेडिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स), ध्वनी रचना, रोटोस्कोपिंग, थ्रीडी मॉडेलिंग आदी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रातील प्रत्येक नोकरीसाठी विशिष्ट कौशल्ये आणि क्षमतांची आवश्यकता असते. यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन कार्यक्रम आखणे अत्यावश्यक आहे. चित्रपटातील अभिनेत्याला सर्वाधिक मानधन मिळते, मात्र चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत असणार्‍या इतरांना फारच कमी पैसे मिळतात, हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे.’ ‘विद्यार्थ्यांनी डिजिटल मीडिया आणि एंटरटेनमेंटमध्ये नवीन करिअर शोधण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे,’ असे डॉ. मुजुमदार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

नगर : पुणतांबे येथे आता विधवा प्रथा बंद

लागला टकळा पंढरीचा

Back to top button