Jalgaon Shivsena : शिवसेनेला आणखी मोठा धक्का; गुलाबराव पाटलांसह इतर काही नेते गुवाहाटीत दाखल | पुढारी

Jalgaon Shivsena : शिवसेनेला आणखी मोठा धक्का; गुलाबराव पाटलांसह इतर काही नेते गुवाहाटीत दाखल

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जवळपास ४० आमदार घेऊन बाहेर पडले आहेत. आजही शिवसेना आमदारांची गळती कायम आहे. शिवसेनेचे एक-एक आमदार गायब होत आहेत. आता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील गुवाहाटीत पोहचल्याची माहिती आहे. पाटील यांनी आधी समर्थकांना ‘जय महाराष्ट्र’ मॅसेज पाठवला आणि त्यानंतर ते नॉटरिचेबल झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (Jalgaon Shivsena)

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास दोन तृतियांश आमदार असल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले गुलाबराव पाटील गुवाहाटीत पोहचले आहेत. त्याचबरोबर योगेश कदम, निर्मला गावित आणि चंद्रकांत पाटील हे आमदार देखील गुवाहाटी मधील ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे हे सर्वजण एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्याने सत्तासंघर्षाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

जिल्ह्यातील चारही आमदार शिंदे गटात

जळगाव जिल्ह्यातील चिमणराव पाटील, किशोर पाटील आणि लता सोनवणे हे तीन आमदार पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून आले होते. तर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे पक्षासोबत उभे असल्याचे चित्र होते. आज सकाळी मात्र हे चित्र बदलले असून ते नॉट-रिचेबल झाले आहेत. ते गुवाहाटीच्या दिशेने निघाल्याची माहिती आहे. तर मुक्ताईनगरचे शिवसेना समर्थक आमदार चंद्रकांत पाटील हे मुंबईला निघाले असून ते तेथून गुवाहाटीत जाणार असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. या माध्यमातून शिवसेनेचे चार तर शिवसेना समर्थक एक असे पाचही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे हे आपले गॉडफादर

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याची बाब आधीपासूनच ज्ञात आहे. शिंदे हे आपले गॉडफादर असल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे नमूद केले आहे. यामुळेच ते शिंदे यांच्या गोटात गेल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे सर्वच आमदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा

Back to top button