पुन्हा तीच आरोळी…गोंद्या आला रे; रँडच्या वधाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महानाट्यप्रयोग

पुन्हा तीच आरोळी…गोंद्या आला रे; रँडच्या वधाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महानाट्यप्रयोग
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शुभ्र घोड्यावर स्वार होऊन रंगमंचावर अवतरणाक्षी झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर उमाजी नाईक आणि वस्ताद लहुजी साळवे, लाठ्या-काठ्या आणि तलवारबाजीची प्रात्यक्षिके व या सर्वांवर कळस चढविणारी 'गोंद्या आला रे…'ची आरोळी आणि त्यानंतर अत्याचारी रँडचा गोळी घालून केलेला अंत…

अशा अनेक रोमहर्षक घटनांनी भरलेले 'स्वातंत्र्याचा क्रांतियज्ञ' महानाट्य तब्बल 15 ते 20 हजार पुणेकरांनी याची देही याची डोळा अनुभवले. निमित्त होते स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि चापेकर बंधूच्या पराक्रमाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे. शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती, पुणे महानगर यांच्या वतीने स. प. महाविद्यालय मैदान येथे झालेल्या या महानाट्याला शालेय विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने गर्दी करून त्यातील एकेक प्रसंगाला उत्स्फूर्त दाद दिली.

इतिहास प्रेमी मंडळ संस्थेच्या वतीने सादर होणार्‍या या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन मोहन शेटे यांनी केले तर वैशाली इनामदार आणि अभिषेक शाळू सहायक दिग्दर्शक होते. सुमारे 125 कलावंत, भव्य रंगमंच, नृत्य व संगीत आणि प्रत्यक्ष घटनेची जिवंत मांडणी यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. दामोदर, बाळकृष्ण आणि चापेकर या तीन बंधूंनी केलेल्या रँड वधाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 1997 मध्ये या महानाट्याचा प्रयोग करण्यात आला होता.

आता या घटनेला 125 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याचा पुन्हा प्रयोग करण्यात आला. त्यात चापेकर बंधूंबरोबरच त्यांच्या आधीच्या व नंतरच्या क्रांतिकारकांच्या कार्यावरही प्रकाश टाकण्यात आला. याशिवाय हेमंत मावळे यांचे पोवाडे गायन, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाचाही यात समावेश होता. निवेदन राहुल सोलापूरकर यांचे होते.

चापेकर बंधूंच्या वंशजांचा सत्कार

या महानाट्याच्या प्रयोगापूर्वी चापेकर बंधूंच्या कुटुंबीयांचे वारस व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी चापेकर कुटुंबीयांचा रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर व शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस. के. जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी महानाट्य समितीचे संयोजक रवींद्र शिंगणापूरकर आणि शि. प्र. मंडळीचे विश्वस्त पराग ठाकूर व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी स्वातंत्र्यसेनानी दामोदर हरी चापेकर यांच्या नातसून प्रतिभा प्रफुल्ल चापेकर, स्वातंत्र्यसेनानी बाळकृष्ण चापेकर यांच्या पणतू सून अनुया चापेकर, राजीव चापेकर, पणती मंजिरी गोडसे व सोनल जोशी यांची उपस्थिती होती. रवींद्र शिंगणापूरकर यांनी आभार मानले, तर पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. नाटकाचे दिग्दर्शक मोहन शेटे, सहायक दिग्दर्शक वैशाली इनामदार व अभिषेक शाळू , महानाट्याच्या समन्वयक वर्षा न्यायाधीश, व्यवस्थापक, कलावंत आणि पडद्यामागील रंगकर्मींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news