नाशिक : अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार | पुढारी

नाशिक : अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी (दि. 20) एल्गार पुकारला. गंगापूर रोड येथील शहीद चौकात निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी ‘जय जवान, जय किसान, अग्निपथ योजना वापस लो’ आदी घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय सैन्य दलात भरतीसाठीची वयोमर्यादा 17 ते 23 वर्षे आणि शिक्षणाची अट दहावी-बारावी करण्यात आली आहे. तरुणांना चार वर्षांकरिता सैन्य भरती करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या योजनेला सरकारने ‘अग्निपथ’ नाव दिले आहे. या योजनेंतर्गत तरुणांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरीवर घेतले जाईल. त्यानंतर त्यापैकी 25 टक्के उमेदवारांची सेवा कायम ठेवताना उर्वरित 75 टक्के युवकांची सेवा खंडित होणार आहे.

केंद्र सरकार सैन्य दलात कंत्राटी भरती सुरू करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. सैन्यातील तरुणांना दोन वर्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. पण, अग्निपथमध्ये प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने केल्याने प्रशिक्षणाचा दर्जा कसा असेल, हे निर्णयातून लक्षात येते. अग्निपथमध्ये 100 टक्के तरुणांना प्रशिक्षण देताना चार वर्षांनंतर 75 टक्के तरुणांना प्रमाणपत्र देऊन निवृत्त करणार आहे. या निर्णयामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढणार असून, हाताला काम नसल्याने प्रशिक्षण घेतलेले तरुण देशविरोधी कारवाई किंवा इतर चुकीच्या मार्गाला लागतील, अशी भीती पक्षातर्फे व्यक्त करण्यात आली. ही योजना रद्द करून पूर्वीप्रमाणे सैन्यभरती सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली अनिता भामरे, शादाब सय्यद, योगिता पाटील, मुकेश शेवाळे, बाळा निगळ, जय कोतवाल, गणेश पवार, सागर बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा :

Back to top button