दानिश कनेरिया म्हणाला, ऋषभच्या वाढत्या वजनाचा कामगिरीवर परिणाम | पुढारी

दानिश कनेरिया म्हणाला, ऋषभच्या वाढत्या वजनाचा कामगिरीवर परिणाम

कराची ; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी मिळालेल्या ऋषभ पंतची स्वत:ची कामगिरी खालावली आहे. याला त्याचे वाढलेले वजन कारणीभूत आहे, अशी टीका पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया याने केली आहे. त्याची तंदुरुस्ती ही चिंतेची बाब आहे, असेही तो म्हणाला.

धावांचा दुष्काळ अन् त्यात बाद होण्याच्या पद्धतीत सातत्य यामुळे त्याच्यावर टीका होताना दिसतेय. पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया यानेही या टीकेत उडी घेतली आहे. तो म्हणाला, भारतीय संघाने चौथ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 82 धावांनी विजय मिळवून मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. या सामन्याचे विश्लेषण करताना कनेरियाने ऋषभच्या फिटनेसवर विधान केले. वाढलेल्या वजनामुळे ऋषभ पंतला जलदगती गोलंदाजांच्या वेळेस यष्टिरक्षण करताना अडचण होत असल्याचे कनेरियाने नमूद केले.

तो म्हणाला, ‘जेव्हा जलदगती गोलंदाज गोलंदाजी करतो, तेव्हा ऋषभ पंत त्याच्या टाचेवर उभा राहत नाही. कदाचित त्याचे वजन जास्त असल्यामुळे त्याला तसे करता येत नाही आणि त्यामुळे त्याच्या शरीराची चपळाईने हालचाल होत नाही. त्याची तंदुरुस्ती ही चिंतेची बाब आहे. तो 100 टक्के तंदुरुस्त आहे का?, परंतु जेव्हा त्याच्या कर्णधाराचा विषय येतो तेव्हा हार्दिक व कार्तिक यांच्यासह गोलंदाज व फलंदाजांकडून त्याला चांगली साथ मिळते आहे.’

यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याची भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर त्याच्या फिटनेसची चर्चा अधिक होऊ लागली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋषभला फार काही कमाल दाखवता आलेली नाही. फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळूनही ऋषभ या मालिकेत त्याच चुका करून माघारी परतताना दिसला.

कनेरियाने यावेळी हार्दिक पंड्या व दिनेश कार्तिक यांच्या भागीदारीचे कौतुक केले. चौथ्या सामन्यात या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 33 चेंडूंत 65 धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 170 धावांचे लक्ष्य उभे केले.

‘भारतीय संघ संघर्ष करत होता आणि त्यावेळी हार्दिक व कार्तिक यांनी डाव सावरला. कार्तिकला स्वीप फटके मारणे आणि पदलालित्य दाखवणे आवडते. सर्वकाही त्याच्या मनासारखे झाले. तो कार्तिक दिवस होता. त्याच्या फलंदाजीतच प्रगल्भता दिसली. हार्दिकनेही जबाबदारीने खेळ केला,’ असे कनेरिया म्हणाला.

Back to top button