कंग्राळेतील ‘त्या’ माथेफिरूचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू | पुढारी

कंग्राळेतील ‘त्या’ माथेफिरूचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा माथेफिरू नवर्‍याने पत्नी, दोन मुले व सासूला ठार मारण्याचा बेत आखला. यातून झटापट होऊन जमावाकडून नवर्‍याला मारहाण झाली व उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. परंतु, आता पोलिसांनी मृताच्या दोघा चुलत मेहुण्यांसह काही तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दिपक पांडुरंग वाके (वय 42, रा. हनुमाननगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताची बहीण प्रभावती पांडुरंग वाके (रा. हनुमाननगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये चेतन लक्ष्मण हुरूडे (वय 24) व सुशांत लक्ष्मण हुरूडे (वय 26, दोघेही रा. गणेश चौक, कंग्राळी बीके) यांच्यासह अन्य काही असा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कल्पना यल्लाप्पा हुरूडे हिचा 15 वर्षांपूर्वी दिपक वाके हिच्याशी विवाह झाला. दीपकने लग्न करताना आपण बंगळुरात एका कंपनीत नोकरीला असल्याचे खोटे सांगितले होते. परंतु, तो कुठेही नोकरीला नव्हता. यानंतर
दिपाला फसल्याची जाणीव झाली तरीही ती कापड दुकानात काम करून संसार करू लागली. या काळात तिला दिया व दिनेश अशी दोन मुले झाली. रिकामा फिरणारा दिपक सतत दिपाशी भांडण काढत होता. तेव्हा दिपा त्याला सोडून दोन्ही मुलांसह माहेरी येऊन राहीली होती. तो देखील येथेच राहायला आला. परंतु, येथेही सातत्याने भांडण काढत होता. येथून तो पुन्हा निघून गेला होता.

वेगळाच प्लॅन, पण फसला

नेहमी भांडणावेळी तो पत्नी दिपा, सासू व दोन्ही मुलांना मारून स्वतः मरायचे आहे, असे सतत म्हणत होता.गुरूवारी रात्री 9 च्या सुमारास येथे पुन्हा येऊन सासूशी भांडण काढले. त्यानंतर त्याने स्वतःचा मुलगा दिनेश याच्या डोकीत चाकूने वार केला. यावेळी पत्नी कामावर गेली होती. ती आल्याचे पाहून घरात मुलीला ओलीस धरत तिच्या गळ्यावर चाकू ठेवून पत्नीला आत पाठवा, असे म्हणत होता. यावेळी जमलेल्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तत्पूर्वी दिपकने घरातील सिलिंडरचा रेग्युलेटर काढून त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला.यावेळी घरातील कपडे व बेड जळाला. यावेळी त्याची नजर चुकवत दरवाजा फोडून आत गेलेल्या लोकांनी सिलिंडर बंद केला व मुलीला त्याच्याकडून काढून घेतले. यानंतर चिडलेल्या जमावाकडून त्याला मारबडव झाली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला.

चूक कोणाची… सजा कोणाला…?

दिपक ज्या पत्नी व मुलाला मारण्यासाठी गेला होता. त्या महिलेचे चेतन व सुशांत हे चुलत भाऊ आहेत. त्यांना सख्खी बहीण नसल्याने हेच तिचे सर्वकाही बघत होते. शिवाय त्यांनी तिला घर बांधून दिले होते. बहिणीच्या मुलांना मारत असल्याचे पाहून ते सोडविण्यासाठी गेले होते. परंतु, दिपक जे कृत्य करीत होता त्यामध्ये अनेकांचा जीव गेला असता, त्यामुळेच या सर्वांना वाचवण्यासाठी या दोघांसह काहीजण पुढे गेले. परंतु, अनावधानाने दिपकचाच यात मृत्यू झाल्याने काहीही चूक नसताना या दोघा सुशिक्षित तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गावातून हळहळ व्यक्त होत आहे.

दोन भावांसह काही ग्रामस्थांवर खुनाचा गुन्हा

Back to top button