संतोष शिंदे:
पिंपरी : खासगी कार्यक्रमात विद्युत रोषणाईचा झगमगाट करण्याचे 'फॅड' सध्या सुरू आहे. अनेकजण प्रखर बीम लाईट आकाशात सोडतात. मात्र, या लाईट्सचा वैमानिकांच्या डोळ्यांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रखर लाईट आकाशात सोडणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
लोहगाव वायुसेना व नागरी विमानतळाच्या साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या परिघात पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीत असलेला भाग येतो. येथील विमानतळावर दिवसा व रात्री वेगवेगळ्या एअरलाईन्सची व भारतीय वायुसेनेची विमाने, हेलिकॉप्टर उतरत असतात. तसेच, येथून नियमित उड्डाणे देखील होत असतात. रात्रीच्या अंधारात वैमानिकांना दिशा व ठिकाण दाखवण्यासाठी रनवेवर व 'एटीसी' टॉवरकडून संकेतासाठी वेगवेगळ्या लाईटसचा वापर करण्यात येतो.
पुणे व पिंपरी- चिंचवड शहर परिसरांमध्ये होत असलेल्या खासगी कार्यक्रमात विद्युत रोषणाईवर भर दिला जात आहे. झगमगाट करून प्रखर बीम लाईट आकाशात सोडल्याचे दिसून येते. त्यामुळे वैमानिकांचे डोळे दिपतात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण होते.
लोहगाव विमानतळाव्यतिरिक्त शहरात काही कंपन्यांमध्ये हेलिपॅड आहेत. या ठिकाणी देखील वैमानिकांना प्रखर लाईट्सचा त्रासाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता प्रखर लाईट आकाशात सोडणार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यू
वायू सेनेने केली तक्रार
आकाशात सोडलेल्या बीम लाईटमुळे वैमानिकांचे डोळे दिपून त्यांना त्रास होत आहे. त्यामुळे भविष्यात एखादा अपघात होऊ शकतो, ही बाब वायू सेनेने पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर पोलिसांनी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या दरम्यान आकाशात प्रखर लाईट्स सोडण्यावर प्रतिबंध केला आहे.
भादंवि कलम 188 नुसार होणार कारवाई
प्रखर बीम लाईट्सचा त्रास होत असल्याबाबत वायुसेनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता सन- 1973 चे कलम 144 प्रमाणे त्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. व्यक्ती अथवा आयोजकांनी आदेशाचे उल्लंघन केल्यास भादवी कलम 188 नुसार कारवाई होणार आहे.
प्रखर बीम लाईटसचा त्रास होत असल्याचे भारतीय वायू सेनेने पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार, लोहगाव विमानतळ नजीक असलेल्या दिघी पोलिस ठाण्यासह इतर विभागांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कार्यक्रमांच्या आयोजकांनी देखील विद्युत रोषणाई करताना अशा प्रकारचे प्रखर बीम लाईट आकाशात सोडणे टाळावे.
– अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.सेनेक
विद्युत रोषणाईचा झगमगाट केल्यानंतर कार्यक्रम स्थळ दुरून नजरेस पडावे, यासाठी अशा प्रकारच्या 'बीम' लाईट्सचा वापर केला जातो. मोठमोठ्या डीजे सिस्टीमवर देखील प्रखर लाईट्स पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे या लाईट्स रस्त्याच्या दिशेने सोडलेल्या असतात. त्यामुळे समोरून येणार्या वाहनचालकाला अंधारी येते. डू