नाशिक : ‘अरंगेत्रम्’मधून फेडले डोळ्यांचे पारणे; सोहा कुलकर्णी यांचा पदन्यास | पुढारी

नाशिक : ‘अरंगेत्रम्’मधून फेडले डोळ्यांचे पारणे; सोहा कुलकर्णी यांचा पदन्यास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तालबद्ध संगीतावर सोहा कुलकर्णी यांनी भरतनाट्यममधून सादर केलेल्या कृलाकृतींनी उपस्थित नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सोहा यांच्या पदन्यासाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

रेषा शिक्षण संस्थेतर्फे आणि सृजननाद संस्थेच्या संचालिका शिल्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनात शनिवारी (दि.4) सोहा कुलकर्णी यांचा अरंगेत्रम् सोहळा पार पडला. कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमास पुणे येथील सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लावली. या सोहळ्यात सोहा यांनी भरतनाट्यममधील सादर केलेल्या विविध भावमुद्रांना रसिकांची पसंती लाभली.  भरतनाट्यम हा मूळ दाक्षिणात्य नृत्यशैलीचा प्रकार आहे. भाव-राग आणि ताल यांचे नाट्य म्हणजे भरतनाट्यम होय. मूळच्या वास्तुविशारद असलेल्या सोहा हिने वयाच्या आठव्या वर्षापासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहेत. सुरुवातीच्या काळात कै. माला रॉबिन्स यांच्याकडे भरतनाट्यमचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुण्याच्या कलावर्धिनी संस्थेच्या नाशिकमधील सृजननाद संस्थेत सोहा यांनी उर्वरित शिक्षण पूर्ण केले. शिल्पा देशमुख यांनी अरंगेत्रम्ची संरचना केली. सोहा यांना गायन व संगीतासाठी ईश्वरी दसककर यांची साथ लाभली. सुनेत्रा मांडवगणे व शिवानी पाठक यांनी सूत्रसंचालन केले. नेपथ्य मुकुंद कुलकर्णी, प्रकाश योजनेसाठी रवि रहाणे व आदित्य रहाणे, तर ध्वनीसाठी पराग जोशी यांनी जबाबदारी पार पाडली. वेशभूषा प्रिया सिंग, रंगभूषा माणिक कानडे व मांडणी मिथिलेश मांडवगणे यांची होती. याप्रसंगी मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button