कोल्हापूर : बाजारभोगाव येथे विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : बाजारभोगाव येथे विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

कळे; पुढारी वृत्तसेवा : बाजारभोगाव (ता.पन्हाळा) येथे दहा दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा मंगळवारी (ता.७) दुपारी साडेतीनच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. भाग्यश्री शहाजी काटकर (वय ३४) असे मृत विवाहितीचे  नाव आहे. तिचा जाचहाट, मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर अशा चौघाजणांविरुद्ध कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी, शेती व गिरण व्यावसायिक असलेल्या शहाजीचा बहादूरवाडी (जि.सांगली) येथील भाग्यश्रीशी अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना स्वरांजली (वय १०) व जयराज (वय ४) अशी मुले आहेत. दि.२८ मे रोजी भाग्यश्रीने विषारी औषध प्राशन केले होते. उपचारासाठी तिला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला दि.४ जून रोजी पुन्हा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.

याबाबत माहिती मिळताच भाग्यश्रीच्या माहेरच्या सुमारे ४० ते ५० नातेवाईकांनी कळे पोलीस ठाण्यात येवून तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सासरच्या संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल होईपर्यंत सर्व नातेवाईकांनी सुमारे पाच तास पोलीस ठाण्यातच ठिय्या मारला. ‘सासरच्या लोकांनी वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देवून जाचहाट केल्याने भाग्यश्रील आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची’ फिर्याद नातेवाईकांनी पोलिसांत दिली. याप्रकरणी पती शहाजी बाळासो काटकर, सासरे बाळासो काटकर, सासू शिला बाळासो काटकर, दिर अमोल बाळासो काटकर या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

Back to top button