अपघातस्थळी रुग्णवाहिका चालकाचा अश्रूंचा ‘सागर’! नाशिकमधील ह्रदयद्रावक घटना | पुढारी

अपघातस्थळी रुग्णवाहिका चालकाचा अश्रूंचा ‘सागर’! नाशिकमधील ह्रदयद्रावक घटना

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
अपघात झाल्याने काही युवक 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेस पाचारण करतात. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल होते. गर्दीतून वाट काढत अपघातग्रस्ताजवळ जाताच गतप्राण झालेला युवक आपलाच काळजाचा तुकडा असल्याचे पाहताच रुग्णवाहिका चालकाचा अश्रूंचा सागर वाहतो… मुलाचा जागेवरच मृत्यू झालेला पाहून पित्याने फोडलेला हंबरडा उपस्थितांनाही सुन्न करुन गेला…

यशवंतनगर येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 5) रात्री साडेअकरा वाजता घडली. अपघातानंतर स्थानिक युवकांनी शासकीय रुग्णवाहिकेसाठी (108) संपर्क साधला असता काही वेळातच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. मात्र, अपघातात मृत झालेल्या युवकाचे वडीलच स्वतः रुग्णवाहिकेचा चालक निघाला अन् पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून या चालक पित्याने हंबरडा फोडल्याने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.

सागर श्रावण खैरनार (22, रा. वासोळ, ता. देवळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अहे. तो सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटल येथे नोकरी करत होता. तर त्याचे वडील श्रावण खैरनार हे सटाणा ग्रामीण रुग्णालयात 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक आहेत. कल्पेश निकम या रुग्णवाहिका चालकाने सागरचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.
दुचाकी रस्त्याच्या मधोमध छिन्नविछिन्न अवस्थेत होती, तर एक युवक रक्ताच्या थारोळ्यात आढळला. युवकांनी अपघाताची खबर सटाणा पोलिसांना कळविली असता अपघातस्थळी पोलिसांसह 108 क्रमांकाची शासकीय रुग्णवाहिका दाखल झाली. रुग्णवाहिका चालक अपघातातील जखमी युवकाच्या जवळ गेला असता तो युवक आपला मुलगाच असून, तो जागीच मृत झाल्याचे पाहून पित्यासह उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.

दवाखान्यात नेता न आल्याची खंत
शहर व परिसरात होणार्‍या अपघातांमधील जखमी रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पोहोचविणार्‍या खैरनार यांना आज त्यांच्याच मुलाच्या अपघातात घटनास्थळी मदत करण्याची वेळ आली. मात्र, अपघातात त्यांचा मुलगा सागर गंभीर जखमी झाल्याने उपचारांच्या आधीच त्याचा मृत्यू झाला. यामुळे अनेकांना जीवदान देणार्‍या खैरनार यांना स्वत:च्या मुलास दवाखान्यातही नेता न आल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button