राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी : दरेकर | पुढारी

राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लावावी : दरेकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यसभा निवडणुकीमधील पराभव स्पष्ट असल्याने महाविकास आघाडी घोडेबाजाराचा मुद्दा पुढे करते आहेे. राज्यात सरकार तुमचे असून, डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही कामे करतात का, अशा परखड शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मविआवर टीका करताना घोडेबाजाराच्या शोधासाठी यंत्रणा कामाला लावा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. शुक्रवारनंतर कोण-कोणासोबत आहे हे स्पष्ट होईल, अशी टिप्पणी त्यांनी केली.

नाशिक दौर्‍यावर असलेल्या दरेकर यांनी रविवारी (दि. 5) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभा निवडणुकीतील पराभव स्पष्ट असल्याने खा. संजय राऊत व मविआचे नेते अपक्ष आमदारांबाबत घोडेबाजाराचा मुद्दा पुढे करून भाजपला बदनाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजपचे काही आमदार संपर्कात असल्याचे सांगत मविआ उमेदवाराचा विजय होईल, असा दावा केला. पाटील यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेताना दरेकर यांनी शुक्रवारनंतर कोण कोणासोबत आहे, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल, असा इशारा दिला. तीन लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या अपक्ष आमदारांबद्दल घोडेबाजार शब्द वापरणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी घटनेचा निषेध केला. सेना उमेदवाराला पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदार किशोर जारगेवार यांनी घोडेबाजारावरून मविआला दिलेल्या सूचक इशार्‍याची त्यांनी आठवण करून दिली.

केंद्रांच्या योजनांमध्ये खोडा
शासकीय योजनांचे श्रेय केंद्र सरकारला मिळू नये यासाठी राज्य सरकार केंद्राच्या योजनांमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप ना. दरेकर यांनी केला. जलजीवन ही पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना असून तामिळनाडू, तेलंगणासारख्या राज्यांनी योजनेचा 25 ते 75 टक्के लाभ घेतला असताना राज्यात केवळ 13 टक्के काम झाल्याचे दरेकर म्हणाले. सामान्यांच्या योजनांमध्ये मविआ राजकारण करत असल्याचे सांगताना सरकार टिकवण्यासाठी मविआ कोरोनाचा बागुलबुवा पुढे करत असल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button