Nashik : ‘माझी वसुंधरा’मध्ये नाशिकला पुन्हा तीन पुरस्कार | पुढारी

Nashik : ‘माझी वसुंधरा’मध्ये नाशिकला पुन्हा तीन पुरस्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘माझी वसुंधरा’ दुसर्‍या टप्प्यातील 2021-22 स्पर्धेतील मानकर्‍यांना मुंबई येथे पर्यावरण दिनानिमित्त गौरवण्यात आले. या अभियानात सलग दुसर्‍या वर्षी निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.

निफाड तालुक्यातीलच चांदोरी ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला पृथ्वी या घटकासाठी विशेष राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचाही सन्मान करण्यात आला.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याने सलग दुसर्‍या वर्षी पर्यावरणपूरक गाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईत टाटा थिएटर येथे झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामीण विकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर आदी उपस्थित होते. ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्यातील 96 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या ग्रामपंचायतींची कामे एप्रिलमध्ये शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या कामांची पडताळणी होऊन उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींची त्रयस्थ संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष पडताळणी केली. यातील तीन ग्रामपंचायतींचा सन्मान झाला.

पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच अलका बनकर, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, गटविकास अधिकारी संदीप कराड, शिरसाठे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच (प्रशासक) गोकुळ सदगीर, ग्रामसेवक हनुमान दराडे, गटविकास अधिकारी लता गायकवाड, चांदोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच (प्रशासक) वैशाली चारोस्कर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button