नाशिक : त्र्यंबक नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी चुरस; भाजपच्या दोन गटांत लढत होण्याची शक्यता | पुढारी

नाशिक : त्र्यंबक नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी चुरस; भाजपच्या दोन गटांत लढत होण्याची शक्यता

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबक नगर परिषदेच्या अंतर्गत निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांमध्ये फूट पडल्याने उपनगराध्यक्षपदाची निवड चुरशीची ठरली आहे. बुधवारी (दि. 1) शिल्पा रामायणे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी दि. 6 जून रोजी निवडणूक जाहीर केली आहे. तर सत्तारूढ गटाने दगाफटका होऊ नये म्हणून काळजी घेत काही नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलविले आहे.

शुक्रवारी (दि.3) भाजपचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्रिवेणी तुंगार-सोनवणे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीकांत गायधनी यांनी दिलेल्या आदेशाने, तुंगार यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचेही सांगितले. नगर परिषद सभागृहातील भाजपचे गटनेते समीर पाटणकर यांनी पक्षाच्या सर्व 14 नगरसेवकांना तसा व्हिप बजावला आहे. पक्षादेश झुगारल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपच्या 14 नगरसेवकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दोन गट निर्माण झाले आहेत. सत्तारूढ गटाने त्रिवेणी तुंगार यांना उमेदवारी दिली आहे, तर रोटेशनप्रमाणे या वेळी दावा असलेल्या शीतल उगले यांना काही नगरसेवकांचा पाठिंबा आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष असलेले नगरसेवक विष्णू दोबाडे हे सुरुवातीपासून विरोधी गटासोबत होते. मात्र यावेळी ते अज्ञातस्थळी गेले आहेत. त्यांचा संपर्क होत नसल्याने पक्षादेश पाळण्यासाठी त्यांनी संपर्क तोडल्याची चर्चा शहरात आहे. दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्र्यंबकनगरीत या राजकारणाची चर्चा होत आहे.

हेही वाचा:

Back to top button