पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीर खो-यात पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. 1990मध्ये काश्मीर पंडितांची हत्या व पलायन झाले, तेंव्हा भाजपच सत्तेत होतं. आताही त्यांचंच सरकार सत्तेवर आहे. अशा परिस्थितीत काश्मीर हे हिंदुंच्या रक्ताने पुन्हा लाल झाले आहे. असे असताना केंद्रातीत सत्तेची आठ वर्ष कसली साजरी करताय? असा संतप्त सवाल करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
काश्मीरची परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. काश्मीरमध्ये रक्तपात होत आहे. देशाचे हे नंदनवन पुन्हा जळत आहे. पण आमचे दिल्लीचे प्रमुख लोक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. काश्मीर फाईल्स, पृथ्वीराज या सारख्या चित्रपटांची प्रसिद्ध केली जात आहे. पण काश्मिरी पंडितांचा आक्रोशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप राऊत यांनी केली.
काश्मीरमधील चिघळलेल्या परिस्थितीवर भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. काश्मीरमधून काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. पण हे लोक ताजमहलातील शिवलिंग शोधत आहेत, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.
काश्मीरमध्ये मुस्लिमही सेक्युरिटी फोर्समध्ये काम करत आहेत. त्यांचीही हत्या होत आहे. श्रीनगरपासून पुलवामापर्यंत आतापर्यंत 20 मुस्लिम जवानांची हत्या झाली आहे. हवालदार, डीवायसएसपी रँकच्या लोकांना मारलं आहे. कारण ते देशाचं संरक्षण करत आहेत. काश्मीर पंडितांना हाकलून लावलं जात आहे. मारलं जात आहे. त्यांना काश्मीर खोरं सोडून आपल्याच देशात परागंदा व्हावं लागलं आहे. पण सरकार काय करत आहे?, असा सवालही राऊत यांनी केला.
महाराष्ट्र सरकार काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि पलायनाबद्दल चिंतेत आहे. आमचे सरकार काश्मिरी पंडितांच्या पाठीशी आहे आणि त्यांना शक्य ती मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राऊत म्हणाले, मी आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला जात आहोत. आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला भेट देणार आहेत. या दौ-यामागे कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.