नाशिक : जिल्ह्यातील इंधन परिस्थिती आठवडाभरात पूर्वपदावर: जिल्हा पुरवठा विभाग; कंपन्यांचे आश्वासन | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील इंधन परिस्थिती आठवडाभरात पूर्वपदावर: जिल्हा पुरवठा विभाग; कंपन्यांचे आश्वासन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील इंधन तुटवड्याचा प्रश्न आजही प्रलंबित असून, पैसे भरूनही दोन ते तीन दिवस इंधन उपलब्ध होत नसल्याने, पेट्रोलपंपचालक हैराण झाले आहेत. पुढील आठवडाभरात परिस्थितीत सुधारणा होऊन ती पूर्वपदावर येईल, अशी ग्वाही इंधन कंपन्यांकडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी अबकारी कर व कमिशनवाढसह अन्य मागण्यांसाठी आक्रमक धोरण घेतले आहे. कंपन्यांकडून पेट्रोलपंपांना कमी प्रमाणात इंधनपुरवठा केला जात आहे. परिणामी जिल्ह्यातील 465 पैकी 76 पंप कोरडे झाले आहेत. बहुतांश पेट्रोलपंपांबाहेर पेट्रोल-डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक झळकत आहे. त्यामुळे वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी चालकांना पेट्रोलपंपांच्या खेटा माराव्या लागत आहेत. मात्र, जिल्ह्यातील इंधन तुटवडा आणि चालकांना होणारा मनस्ताप पाहता, जिल्हाधिकारी कार्यालयात इंधन कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत प्रतिनिधींनी इंधनाचा 84 टक्के पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले. उर्वरित पुरवठा आठ दिवसांत सुरळीत करताना टँकर असलेल्या डीलर्सकडे त्वरित इंधन उपलब्ध करून देण्यात येतील, असे देण्याचे आश्वासन प्रतिनिधींनी दिले आहे.

तुटवड्याची शक्यता
जिल्ह्यातील बंद असलेल्या पंपांमध्ये भारत पेट्रोलियमच्या सर्वाधिक 55 पंपांचा समावेश आहे, तर हिंदुस्थान पेट्रोलियमचे 14 व इंडियन ऑइलचे 7 पंप आहेत. दरम्यान, कंपन्यांकडे पैसे भरूनही डीलर्सना दोन ते तीन दिवसांनी इंधनाचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पंपचालकांची अडचण होत आहे. सोमवारी (दि.6) इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button