Nashik : ‘कोम्बिंग’मध्ये 13 टवाळखोरांवर नाशिकरोडला कारवाई | पुढारी

Nashik : ‘कोम्बिंग’मध्ये 13 टवाळखोरांवर नाशिकरोडला कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने तोंड वर काढल्याने, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनसह मिशन ऑलआउट राबविण्यास सुरुवात केली आहे. नाशिकरोड परिसरात राबविण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये 13 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली असून, रेकॉर्डवरील 12 संशयितांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर दरोड्याच्या गुन्ह्यातील एकाच्या मुसक्या आवळल्या असून, दारूबंदी कायद्यान्वये एकावर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात सातत्याने खुनाच्या घटना समोर येत आहेत. त्याचबरोबर चेनस्नॅचिंग, घरफोडी व इतर गुन्ह्यांचे प्रकारही समोर येऊ लागल्याने पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलिसांनी दोन्ही मोहिमा राबविल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी (दि. 2) रात्री 8 ते 11 दरम्यान नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे व पोलिस निरीक्षक (प्रशासन) राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकलहरा, सिन्नर फाटा, रेल्वे स्टेशन, जेलरोड, देवळाली गाव या ठिकाणी मोहीम राबविण्यासाठी पाच वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आठ पोलिस अधिकारी व 69 पोलिस अंमलदार सहभागी होते.

यावेळी संशयित यश विनायक जाधव (20, रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड, नाशिकरोड) याला अटक करण्यात आली आहे. तो चांदवड पोलिस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांना सापडत नव्हता. त्याला चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. त्याचबरोबर परिसरातील टवाळखोरांच्या मुसक्याही आवळण्यात आल्या आहेत. या मोहिमेमुळे पोलिस अधिकारी व अंमलदार पायी पेट्रोलिंग व कारवाई करताना दिसून आल्याने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

दररोज होणार कारवाई
कारवाईत दारूबंदी कायद्यान्वये एकाला अटक करण्यात आली. तसेच पाच तडीपारांना चेक करण्यात आले. तसेच विहित वेळेत आस्थापना बंद न करणार्‍या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दररोज करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

Back to top button