मोदींना हटवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाशिवाय पर्याय नाही-पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

मोदींना हटवण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाशिवाय पर्याय नाही-पृथ्वीराज चव्हाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशातील उदारमतवादी लोकशाही टिकवण्यासाठी भाजपचा पराभव करण्यालाच सर्व राजकीय पक्षांनी प्राधान्य देण्याची गरज आहे व त्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांची एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. तसेच संपूर्ण देशभर केवळ काँग्रेस पक्ष असून, कोणताही प्रादेशिक पक्ष देशव्यापी नेतृत्व करू शकत नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व काँग्रेसच करू शकते, या भूमिकेचे समर्थन केले.

नाशिक येथे आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा काँग्रेस समिती कार्यालयास भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाची आर्थिक व्यवस्था, काँग्रेसचे उदयपूर नवसंकल्प शिबिर, काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक आदी विषयांवर भूमिका मांडली. ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेचे दिवाळे निघाले आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, महागाई निर्देशांक आठ टक्क्यांवर जाणे, रुपयाची किंमत घटणे व वाढती बेरोजगारी यामुळे निवडणूक जिंकण्याची शक्यता नसलेल्या भाजपने आता धार्मिक ध—ुवीकरणाचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. परिणामी 2024 मध्ये पुन्हा भाजप सरकार आल्यानंतर देशाची गणना लोकनियुक्त हुकुमशाही देशांमध्ये होईल. त्यामुळे भाजपला सत्तेवरून हटवणे यालाच सर्व विरोधी पक्षांनी प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी सर्व विरोधी पक्षांनी मतभेद विसरून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा आहेर, डॉ. हेमलता पाटील, माजी खासदार डॉ. प्रतापराव वाघ, शरद आहेर, शाहू खैरे, वत्सला खैरे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोदी संघाचे ऐकतात का?
मोदी संघाचे ऐकतात का, हा प्रश्न आहे. संघाच्या एखाद्या दुसर्‍या व्यक्तीला खासदारकी दिली, यावर संघ खूश असेल, तर आपण काय करणार? मोदींपुढे संघाचे काहीही चालत नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या किती मशिदींमध्ये शिवलिंग शोधणार, या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा :

Back to top button