कण्हेरी ग्रामस्थांचा प्रभाग रचनेवर आक्षेप | पुढारी

कण्हेरी ग्रामस्थांचा प्रभाग रचनेवर आक्षेप

खंडाळा : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा परिषद गट-गण रचनेच्या यादीमध्ये खंडाळा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्‍या कण्हेरी गावाला पूर्वेकडील भादे गटात दाखल केल्याने कण्हेरी ग्रामस्थांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, न्याय न मिळाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती सरपंच शिवाजी मोरे यांनी दिली.

जिल्हा परिषद प्रारूप गट – गण रचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये तालुक्याच्या पश्चिमेस असणारे कण्हेरी गाव हे खेड बुद्रक गटातून भादे गटात समाविष्ट केले आहे. याबाबत लवकरच हरकती घेवून खेड बुद्रक या गटात कण्हेरी गाव ठेवण्यासाठी आ. मकरंद पाटील यांची भेट घेण्याचे बैठकीत ठरले.

दरम्यान, कण्हेरी हे गाव खंडाळ्याच्या पश्चिमेस 11 किलोमीटर असून शिरवळ व खंडाळा यापासून हे गाव 11 ते 15 किलोमीटर लांब आहे. त्यामुळेे येथील नागरिक खंडाळा व शिरवळ या बाजारपेठेत जोडले गेलेले आहे. यापूर्वी ते शिरवळ या गटामध्ये होते. त्यानंतर प्रभाग रचनेत खेड बुद्रुक गटात समाविष्ट करण्यात आले. मात्र सध्याच्या रचनेत कण्हेरी हे जवळपास 25 किमी लांब असणार्‍या व टोकावर असणार्‍या भादे गटास हे गाव जोडण्यात आले आहे.

aनवीन गट रचनेमुळे गावाची हेळसांड होणार आहे. यासाठी शिरवळ किंवा खेड बुद्रक या दोन्हीपैकी एका गटात जोडण्यात यावे. अन्यथा ग्रामस्थ येणार्‍या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याचे सरपंच शिवाजी मोरे यांनी स्पष्ट केले. याबाबत महसूल विभागाला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे तालुका अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, सरपंच शिवाजी मोरे, विजय चव्हाण, मच्छिंद्र कुंभार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button