नाशिक : शहरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणार, चौथी लाट रोखण्यासाठी महापालिका सतर्क | पुढारी

नाशिक : शहरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणार, चौथी लाट रोखण्यासाठी महापालिका सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाची संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उपाययोजना हाती घेतल्या असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोना चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेत तसे अलर्ट सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना कळविण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका सतर्क झाली असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण तसेच कोरोना चाचण्यांची संख्या 500 पर्यंत वाढविण्याचा निर्णय आरोग्य वैद्यकीय विभागाने घेतला आहे.

सर्वच वयोगटांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट त्रासदायक ठरली नाही. गेल्या काही महिन्यांपासून तर नाशिक शहरातील रुग्णांची संख्या एक ते दोन अशीच राहिलेली आहे. यामुळे आजमितीस तरी नाशिक शहर कोरोनापासून दूर राहिले असले तरी संभाव्य चौथी लाट लक्षात घेता उपाययोजना करण्यात येत आहे. दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्र राज्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. पुण्यात कोरोनाचा ‘बी-5’ हा नवीन व्हेरियंट आढळला आहे. तर मुंबईतही रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार नाशिक महापालिका यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली असून, कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.

सध्या दिवसाला 150 ते 200 इतक्या कोरोना चाचण्या होत आहेत. त्यात वाढ करून ही संख्या 500 पर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय तसेच 30 शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ हा फॉर्म्युला अवलंबिण्यात येणार आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. त्यासाठी पथक नेमण्यात येणार आहेत.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे,
वैद्यकीय अधिकारी, मनपा

हेही वाचा :

 

Back to top button