रोबो ठेवणार तुमचे घर आरशासारखे चकाचक | पुढारी

रोबो ठेवणार तुमचे घर आरशासारखे चकाचक

टोकियो : आपले घर आरशासारखे स्वच्छ असावे असे जवळपास प्रत्येकाला वाटते. त्यासाठी झाडू घेऊन साफसफाई करावी लागते आणि अनेकांना त्याचा कंटाळा येतो. अशा लोकांनी आता घराची स्वच्छता कोण करणार याची चिंता करण्याचे कारण उरलेले नाही. घर स्वच्छ ठेवण्याची कामगिरी पार पाडण्यासाठी चक्क रोबो आलाय. तुमचे घर विशाल असो किंवा छोटे. या रोबोला तुम्ही फक्त सूचना करायची की, कोणती खोली कशाप्रकारे स्वच्छ करायची.

त्यासाठी यात वेगवेगळे संवेदक (सेन्सर) बसवण्यात आले आहेत. तुम्ही फक्त आवाजाद्वारे सूचना द्यायच्या आणि रोबो घराचा प्रत्येक भाग लख्ख करेल. मुख्य म्हणजे यातही अनेकविध प्रकार उपलब्ध असून तुम्हाला तुमच्या खिशाला परवडेल अशाप्रकारे रोबो उपलब्ध होऊ शकतो. समजा तुम्ही घराबाहेर असलात तरी काळजी नको. हातातील स्मार्ट फोनद्वारे तुम्ही या अनोख्या सफाई यंत्राला नियंत्रित करू शकता. घरात अडगळीची ठिकाणे असली त्याची चिंता करण्याचे कारण नाही. तिथेसुद्धा हा रोबो सहजगत्या पोहोचतो आणि तुमचे घर ठेवतो एकदम चकाचक… रोबो ही नजीकच्या भविष्यकाळात आपल्या सर्वांचाच सहकारी असणार हे खरे.

संबंधित बातम्या
Back to top button