नाशिकमध्ये देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्घाटन | पुढारी

नाशिकमध्ये देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरू झाले असून, ही बाब नाशिक शहर जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. या ग्राहक प्रबोधन केंद्राच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे हक्क व कायद्याची माहिती मिळून जागरूकता वाढणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

वैधमापनशास्त्र विभाग, महापालिका व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रॅफिक पार्क येथे ग्राहक प्रबोधन केंद्राचे उद्घाटन ना. भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैधमापनशास्त्र यंत्रणेचे नियंत्रक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, वैधमापनशास्त्र विभाग नाशिकचे सहनियंत्रक नरेंद्र सिंह, उपनियंत्रक जयंत राजदेरकर, बाळासाहेब जाधव, नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी, संचालक सुरेश पटेल व ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष सुधीर काटकर उपस्थित होते.

ना. भुजबळ म्हणाले की, ग्राहकांच्या तक्रारी नेहमी येत असतात. ग्राहक नेहमी फसविला जात असतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहकांच्या फसवणुकीला आळा बसेल. शिक्षित असणार्‍या व्यक्तीबाबत फसवणुकीचे प्रकार कमी होतात. त्यामुळे शालेय जीवनापासून मुलांच्या पाठ्यपुस्तकात ट्रॅफिक आणि ग्राहक प्रबोधनाच्या माहितीचा समावेश करण्यात यावा. असे ग्राहक प्रबोधन केंद्र राज्यातील प्रत्येक विभागात सुरू करावेत. त्यानंतर जिल्हास्तरावर ग्राहक प्रबोधन केंद्र उभारण्यात यावेत. महाराष्ट्रात अपघातांचे प्रमाण अधिक आहे. बर्‍याचदा वाहन चालविणार्‍यांना नियमांची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे या ट्रॅफिक पार्कच्या माध्यमातून अवजड वाहनांचे वाहनचालक व इतर वाहने चालविणार्‍यांसाठी प्रशिक्षण शिबिर राबविण्याची सूचनाही ना. भुजबळांनी केली.

ग्राहकांपर्यंत माहिती पोचविणार
डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ग्राहक संरक्षण आणि वैधमापनशास्त्र विभागाचे काम माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असते. वैधमापनशास्त्र विभागासाठी ग्राहक प्रबोधन केंद्र एक नवी सुरुवात आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व नोंदी घेतल्या जात असल्याने या विभागाचे काम पारदर्शकपणे सुरू असल्याचे सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून कायद्याविषयी माहिती ग्राहकापर्यंत पोहोचविली जाणार असून, ऑडिओ-व्हिडिओद्वारे, मनोरंजनाच्या माध्यमातून सर्व माहिती दिली जाणार आहे.

हेही वाचा :

Back to top button