धुळे : तापी योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया | पुढारी

धुळे : तापी योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी योजनेची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. आधीच धुळे शहरात महापालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असतानाच जलवाहिनी फुटल्याने आणखी दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटतो आहे.

धुळे शहराला तापी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणी योजनेच्या जलवाहिनीला नेहमीच गळती लागण्याच्या घटना होतात. या जलवाहिनीला खामखेडानजीक मोठी गळती लागली. काही क्षणांतच जलवहिनी फुटल्यामुळे पाण्याचे कारंजे उडण्यास सुरुवात झाली. यात लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरू झाली. ही माहिती महानगरपालिकेच्या तांत्रिक विभागाला कळल्यावर या जलवाहिनीवरील पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, तोपर्यंत जलवाहिनीमधील शुद्ध केलेले पाणी सुमारे अडीच तास वाहत होते. जलवाहिनी फुटल्यामुळे धुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महानगरपालिका प्रशासनाने सहा जलकुंभावरून एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होणार असल्याचे आवाहन केले असले, तरीही जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे धुळेकरांना आणखी दोन ते तीन दिवस अतिरिक्त पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

Back to top button