नाशिकमध्ये आज मध्यरात्रीपासून जमावबंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश | पुढारी

नाशिकमध्ये आज मध्यरात्रीपासून जमावबंदी, पोलिस आयुक्तांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात ठिकठिकाणी धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यासह ज्ञानवापी मशिद व महादेव मंदिर जागेचा वाद आणि ओबीसी आरक्षणासाठी आंदोलने व निदर्शने होत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 15 दिवस प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रविवार (दि. 29) पासून केली जाणार आहे. 12 जून पर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

नाशिक शहरात राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना व कामगार संघटनांकडून मोर्चे, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषण अन्य धार्मिक सण, यात्रा/ जत्रा इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशात कोठेही जातीय संघर्षाच्या घटना घडल्यास त्याच्या प्रतिक्रिया शहरात उमटण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तालय हद्दीसाठी नाईकनवरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास बंदी असून सभा घेण्यास, मिरवणुकीसाठी पूर्वपरवानगी लागणार आहे. जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, अंत्ययात्रा, सिनेमागृह आदींसाठी लागू नसल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड अथवा शस्त्रे, हत्यारे, तलवारी, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रतीकात्मक पुतळे व त्यांचे दहन, घोषणाबाजी, वाद्य वाजविणे, आवेशपूर्ण भाषणे, महाआरती करणे आदींवर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button