नाशिक : संतप्त कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले ; भाजपाचा रास्ता रोको  | पुढारी

नाशिक : संतप्त कार्यकर्त्यांनी ग्रामसेवकाला कार्यालयात डांबले ; भाजपाचा रास्ता रोको 

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर-शिर्डी मार्गावरील पांगरी येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.  भीषण पाणीप्रश्नीचे गांभीर्यच नसलेल्या व रणरणत्या उन्हात पाण्यासाठी आंदोलन सुरु असताना कार्यालयात शांतपणे बसलेल्या ग्रामसेवकाला संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयामध्ये डांबत बाहेरून टाळे ठोकले.

तालु्क्यात अल्प प्रमाणातच पाऊस पडल्याने ऐन उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भेडसावत आहे. नदी, नाले, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. जनावरांना पाणी तसेच मुबलक चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे हातात कामच नसल्याने अनेक शेतमजूर कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींची दाहकता शासनापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या वतीने जवळपास 45 मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनासाठी अनेक महिला रिकामे हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. तर पांगरी व पंचक्रोशीतील जवळपास 500 लोक या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान वाहतुककोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.  याबाबत वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी तालुका प्रभारी जयंत आव्हाड, शहराध्यक्ष मनोज शिरसाट, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, दिनकर कलकत्ते, सुभाष पगार, किशोर देशमुख, सुमन जोशी, मंगला झगडे, प्रियांका द्विवेदी, उर्मिला लासूरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी देण्याच्या आश्वासनानंतरच सोडवणूक
रास्ता रोको आंदोलनानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पांगरी ग्रामपंचायत कार्यालयाकडे वळविण्यात आला. ग्रामसेवकाला कार्यालयांमध्येच डांबून बाहेरून टाळे ठोकण्यात आल्यानंतर त्यांनी आठवड्याच्या आत पाण्याबाबतची मागणी शासनाकडून पूर्ण करून घेतो असे आश्वासन दिल्यानंतरच कार्यालयाचे टाळे काढून त्यांना सोडण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button