नाशिक : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबवा – ना. डॉ. भारती पवार यांचे निर्देश | पुढारी

नाशिक : अपघात रोखण्यासाठी उपाययोजना राबवा - ना. डॉ. भारती पवार यांचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात 130 अपघातप्रवण क्षेत्रे असून, गेल्या वर्षी तब्बल 1,063 अपघातांची नोंद झाली आहे. देशात अपघातांच्या यादीत नाशिकचा क्रमांक वरती असून, जिल्ह्यासाठी हे खेदजनक आहे. अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. तसेच नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यंत्रणांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि.24) डॉ. पवार यांनी वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोेड, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात गेल्या वर्षी रस्ते अपघातात 788 जणांना जीव गमवावा लागला असून, 548 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. वाढते अपघात हे नागरिकांच्या जीवावर बेतू लागल्याने या मुद्द्यावर हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा डॉ. पवार यांनी दिला. महामार्गांवर वेगवान वाहनांवर कारवाईसाठी आरटीओंनी पथके नेमावी. तसेच अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना महामार्गावर वेग नियंत्रणाचे फलक लावण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

सातत्याने अपघात होणारी ठिकाणे निश्चित करताना वाढत्या अपघातांची कारणे शोधावी. तसेच अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. पवार यांनी केल्या. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी पोलिस, आरटीओ व संबंधित यंत्रणाच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेली समिती गठीत करावी. अपघात रोखण्यासाठी समितीच्या नियमित बैठका घेत उपाय राबवावे. अपघातप्रवण भागात ग्रामस्थांच्या मागणीनुसार रम्बलर, फलक, स्पीडब—ेकर व अन्य उपाय करावेत, असेही त्यांनी सांगितले.

मंकीपॉक्सबाबत सूचना
देशात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही. परंतु, या आजाराबाबत खबरदारीच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या धर्तीवर परदेशातून येणार्‍या नागरिकांच्या चाचण्या कराव्यात, अशा सूचनाही राज्यांना दिल्याचे डॉ. पवार यांनी सांगितलेे.

हेही वाचा :

Back to top button