मुलगी झाल्याने महिलेला घरातून हाकलले | पुढारी

मुलगी झाल्याने महिलेला घरातून हाकलले

मिरज : पुढारी वृत्तसेवा
मुलगी जन्माला आल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी माहेरकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून सासरच्याने विवाहितेला बाळासह घरातून हकलून दिले. याप्रकरणी शाहीन अरिफ जमखानवाले हिने मिरज शहर पोलिसात पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध फिर्याद दिली.
पती अरिफ , सासरा नजीरअहमद, सासू जायदा, नसरीन मोहसीन मिरजकर (तिघे रा. नदीवेस, माळी गल्ली, मिरज) आणि नणंद यास्मिन मुस्ताक कसबा (रा. सीसीएस विजयवाडा, आंध्रप्रदेश) या चौघांचा समावेश आहे. शाहीन जमखानवाले यांच्या फिर्यादीनुसार शाहीन आणि अरिफ या दोघांचाही दुसरा विवाह झाला होता. अरिफ याला पहिल्या पत्नीची दोन मुली आहेत. अरिफ याच्याकडून शाहीनला पहिले अपत्य राहिले होते. मात्र, त्याचा गर्भपात झाला होता. दुसर्‍या अपत्यावेळी तिच्या सासरच्यांना मुलगा हवा होता. शाहिन हिला प्रसुतीसाठी दवाखान्यात दाखल करण्याच्या आधीपासून मुलगाच व्हायला पाहिजे, म्हणून शाहिनवर दबाव आणून दमदाटी करुन शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. बाळंतपणाचा खर्च करणार नाही म्हणून तिला माहेरी पाठवले होते.

परंतु शाहीनला मुलगी झाली. त्यानंतर सासरच्यांनी दवाखान्यात येऊन पुन्हा शाहीनला शिवीगाळ केली. बाळंतपणानंतर शाहिन या मुलीला घेऊन घरी आल्या असता संशयितांनी आम्हाला वंशाला दिवा पाहिजे होता. पण पुन्हा मुलगीच जन्माला आली. आता तुझ्या मुलीचा आणि तुझा सांभाळ करण्यासाठी माहेरच्यांकडूनच पाच लाख रुपये आण, असे म्हणून जन्मलेल्या नवजात मुलीसह शाहिनला घरातून हकलून दिले. तसेच लग्नातही तुझ्या माहेरच्यांनी हुंडा दिला नसल्याचे कारण काढून शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

Back to top button