स्पाईन फौंडेशनचे कार्य मानवतावादी : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव | पुढारी

स्पाईन फौंडेशनचे कार्य मानवतावादी : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : तळागाळातील, खेड्यापाड्यातील गोरगरिबांसाठी सुरू असलेले ‘स्पाईन फौंडेशन’चे काम हे मानवतावादी कार्य आहे. या फौंडेशनच्या मागे कोल्हापूरकर ठाम उभे राहतील, त्याला भरभरून मदत करतील, असा विश्वास दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी व्यक्त केला.

विख्यात स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या ‘माईंड स्केप’ या चित्रकला पुस्तकाचे डॉ. जाधव यांच्या हस्ते व केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी प्रकाशन झाले. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
मानवतावादी द़ृष्टिकोन फार कमी लोकांत दिसतो. पण मानवतावादी कामाची आस घेऊन स्पाईन फौंडेशनची स्थापना करून, जे कार्य डॉ. भोजराज करत आहेत, त्याला कोल्हापूरकरांचा सलामच आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, डॉक्टर म्हणजे समाजाचा शिक्षक असतो, मार्गदर्शक असतो. त्याच भावनेने डॉ. भोजराज मानवतेची सेवा करत आहेत. जे जगविख्यात स्पाईन सर्जन आहेत, तितकेच ते चांगले कलाकारही आहेत. दोन्ही क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. व्यवसाय सांभाळत कलेची ऊर्मी त्यांनी सांभाळली आहे. असे सर्वांनाच जमते असे नाही. त्यांच्या हातून आणखी मानवसेवा घडत राहील, असा विश्वासही डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.

राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूर बनले कलापूर
राजर्षी शाहू छत्रपती यांनी राज्य कारभार हाती घेतल्यानंतर विविध कलांना उत्तेजन दिले. संगीत, गायन, रंगभूमी, चित्रकला, शिल्पकला अशा कला क्षेत्रात अनेक दिग्गजांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांच्या या दूरद़ृष्टीमुळे कोल्हापूरचे नाव कलापूर म्हणून प्रसिद्धीला आले. अशा या ऐतिहासिक कलानगरीत या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, हा मणि-कांचन योग आहे, असे ते म्हणाले.

कला ही ध्यानधारणाच
डॉ. भोजराज यांनी सामाजिक बांधिलकी जपत कलेचा व्यासंग केला आहे. कोणतीही कला, मग ते संगीत असो, गायन असो की चित्रकला, ही खर्‍या अर्थाने ध्यानधारणाच असते. कलाकारांनी आपल्या कलेला वाहूनच घेतलेले असते. आपल्या कलेशी ते एकरूपच झालेले असतात. त्यामुळे त्यांना वेगळ्या मेडिटेशनची गरजच नसते. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्यासारखे जगविख्यात कलाकार दीर्घायुषी होतात, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

सेवाभाव हे देशासाठी योगदान : माहुरकर
केंद्रीय माहिती आयुक्त माहुरकर म्हणाले, सेवेची वृत्ती सर्वांकडे असते. पण ही सेवा कधी आणि कुठे द्यावी, यावरच त्याचे मूल्य ठरते. योग्य ठिकाणी असणारा सेवाभाव हे देशासाठी महत्त्वपूर्ण योगदानच असते. सर्वसामान्य, गोरगरीब, मागास अशा लोकांसाठी डॉ. भोजराज यांची ही सेवा हे खूप मोठे काम आहे.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. भोजराज यांचा राजर्षी शाहू प्रतिमा देऊन डॉ. जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. भोजराज, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, ममता देसाई, चित्रकार संजय शेलार, प्राचार्य अजय दळवी, विजय टिपुगडे उपस्थित होते. डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सलीम लाड यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. तुषार देवरे, डॉ. उदय घाटे, डॉ.प्रदीप पाटील, डॉ. उमेश जैन, डॉ. गौरेश किंकरे, डॉ. हरकिशन, डॉ. प्रेमी, जॉय चौधरी, शशिकांत पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Back to top button