

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या शेतकर्याने बांध फोडला, दुसर्याची म्हैस पिकात शिरली, भावाने वाटणी देण्यास नकार दिला, बाजूच्या शेतकर्याने अतिक्रमण केले यासारख्या घटनावरून ग्रामीण भागात मारामार्यांचे प्रमाण वाढत आहेत. तालुक्यात आठवड्याला 4 ते 5 तर महिन्याला किमान 15 मारामारीच्या घटना होत असून ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हे नोंद होत आहेत.
राज्यातील मारामार्यांची माहिती सध्या प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मारामार्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भाग मारामारीमध्ये अधिक प्रमाणात गुंतत चालल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात जास्तीतजास्त मारामारीच्या घटना जमिनीवरून होत असतात. लहानसहान कारणाने भांडणे उकरून काढून मारामारीच्या घटना होत आहेत. यामध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. राज्यातही या घटनांचे प्रमाण अधिक प्रमाणात आहे. राज्यभरात जमिनीसी निगडित मारामारीतून नोंदविण्यात येणारे रोज किमान 12 गुन्हे घडत आहेत.
कोरोनाकाळात सर्वत्रच गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले होते. पोलिस स्थानकांत गुन्हे नोंद करणार्यांची संख्या अत्यल्प होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मारामारीच्या घटनांनी उचल खाली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही जमिनीची मागणी वाढली आहे. दर गगनाला भिडले आहेत. त्यातून मारामारीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. जमिनीच्या वादातून ग्रामीण भाग अशांत बनत चालला आहे.