कोल्हापूर : पूरबाधित गावांचे आराखडे अद्ययावत करा | पुढारी

कोल्हापूर : पूरबाधित गावांचे आराखडे अद्ययावत करा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पूरबाधित गावांचे आराखडे अद्ययावत करा, अशी सूचना पुणे विभागीय उपायुक्त रामोड यांनी मंगळवारी जिल्हा प्रशासनाला केली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आयोजित बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पूरनियंत्रण तयारीचा आढावा घेतला.

जिल्ह्याला यापूर्वी पुराचा फटका बसलेला आहे. यामुळे पूर नियंत्रणाच्या द़ृष्टीने आवश्यक सर्वच बाबींवर लक्ष केंद्रित करा, त्याचे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करा, त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्या. पूरबाधित गावातील, भागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवा, त्यासाठी कम्युनिकेशन सिस्टिमचा अधिक प्रभावी वापर करा. पूर नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवा, अशा सूचना यावेळी रामोड यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा प्रशासन पूर नियंत्रणासाठी सज्ज असल्याचे सांगत केलेल्या तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात बसविण्यात आलेल्या ‘पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टिम’चा आणखी प्रभावीपणे वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूरबाधत गावांसाठी आरोग्य विभागाने केलेल्या आराखड्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोल्हापूर शहरातील पूर नियंत्रणाबाबत केल्या जात असलेल्या उपाय योजना आणि शहराच्या आराखड्याबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण (Sanjay Singh Chavan) यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तयारीची माहिती सांगितली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जलसंपदा, महावितरण आदींसह संबधित सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button